शेतकर्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून बैलपोळा सणाकडे पाहिले जाते. परंतु यंदाही गतवर्षी प्रमाणे बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट आहे. पोळ्यावर निर्भर असलेल्या बैलांच्या साजाचा व्यापारी देखील उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाल्याचे चित्र आहे. अश्यात व्यापारी वर्गाने बैलांच्या सजावटीचे साहित्य गावागावात जाऊन विकायला सुरुवात केली असली तरी बाजारात साहित्य विकणे आणि घेण्याची मजा काही वेगळीच असते, ती दारावर आलेल्या साहित्याला नसल्याचे मत शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करीत आहेत. शेतकर्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून बैलांना आंघोळ घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. हरभर्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते. या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लोणी लावण्यासह धोपा अळुच्या पानाने खांदा शेकल्या जातो. सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. बैलांची ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते व सर्व बैल मारोतीच्या मंदीरासमोरच्या मैदानात आंब्याच्या डहाळ्या बांधलेल्या तोरणाखाली आणुन ऊभे करुन मानाचा गावपाटील पुरणपोळी करीता शिजवलेल्या विनासाखर गुळाचा घाट लावतो.घाट लावुन पुजन केल्यानंतर पोळा फुटतो. पुजन करताना काही स्थानीक बोलीत लयबद्ध कडवे गायन होते ह्यास झाडणी म्हटल्या जाते. नंतर प्रथम आपल्या घरी आल्यावर घरधनीन ज्वारीचा तयार केलेला ठोंबरा चारुन पुजन करते.कोरोना महामारीने संपूर्ण शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही विळखा घातला. दिवसाला वाढते रुग्ण आणि होणार्या मृत्यूने देखील यंदा अनेक सणांवर विरजन टाकले. आता स्थिती नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसर्या लाटेचा धोका पहाता सणांवरही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. अशात थोड्या प्रमाणात शेतकर्यांचा सणाला मोकळीक येणार ही आशा शेतकर्यांना होती. शासन यंदाच्या तरी बैलपोळा सणाला शिथिलता देईल, हा विचारही निरस्त झाला असल्याने शेवटी शहरात बैलांच्या सजावटीच्या साहित्याचे बाजार लावून गर्दी करण्यापेक्षा व्यापारीवर्गाने शेतकर्यांचा मित्र असलेल्या बैलाशी कृतज्ञता व्यक्त करणार्या पोळा सणानिमित्त मठाठ्या, बेल्हे, घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी, रंग, हिंगुळ सर, बेगड, घोगरमाळ, मोरखी या वस्तू गावोगावी फिरून शेतकर्यांच्या दारात पोहोचून विक्री सुरू केली आहे. ग्रामीण भागात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर शेतात शेतकर्यासोबत राबराब राबून परिश्रम करून मातीत सोनं पिकविणार्या बैलाला पुरणपोळी घालण्याचा हा एकच दिवस असतो. या दिवशी शेतकरी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. वर्षभर सेवा करणार्या बैलांची एक दिवस सेवा केली जाते. यानिमित्त येथील बाजारपेठेत सजावटीच्या विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. परंतु बाजारावर सध्या मंदीचे सावट आहे.यंदाही पोळा न भरल्यास बैलाना घरीच गोठ्यातच घाट लावावा लागणार काय याबाबत बैलमालक साशंकच आहे.
कोरोनाच्या छायेतच बैलपोळा साजरा होणार.गावात गावात साहित्य विक्रीला प्राधान्य.बैल तोरणाखाली उभी राहणार की नाही.बैलाना गोठ्यातच घाट लागणार काय?
राजु भास्करे /चिखलदरा