कोरोना काळात चारबन शाळेला मिळविली एका लाखाहून अधिक लोकवर्गणी.शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम!!
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-
जळगांव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी,दुर्गम भागातील जि.प.मराठी प्राथमिक शाळा चारबन च्या शिक्षकांनी कोरोना काळात मुलांची ऑनलाईन अभ्यासाची अडचण लक्षात घेता व शाळा आय.एस.ओ .करण्याच्या उद्देशाने समाजातून लोकवर्गणी स्वरूपात एक लाख हुन अधिक रक्कम मिळवीण्याचा स्तुत्य उपक्रम अंमलात आणला आहे.जळगांव जा तालुक्यातील चारबन ही शाळा वेगवेगळे उपक्रम राबवणारी दुर्गम,आदिवासी भागातील शाळा असून सदर गावात गरीब,आदिवासी लोक वास्तव्य करतात कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी खुप अडचणी येत होत्या.शाळेचे भौतिक वातावरण खुप सुंदर असून शाळेची आय.एस.ओ.कडे वाटचाल सुरू आहे.वरील सर्व बाबीकरिता भरपूर आर्थिक तरतुदींची गरज असल्याने शाळेतील शिक्षक दीपक उमाळे यांनी पुढाकार घेऊन गोवर्धन दांडगे,माधव मोसंबे,ममता गावित या शिक्षकांच्या सोबतीने शाळेसाठी कम्प्युटर,शाळा प्रवेशद्वार, एल.इ.डी. टीव्ही,इन्व्हर्टर, बॅटरी,पंखे,आणि रोख रक्कम च्या स्वरूपात 1लाखाहून अधीक लोकवर्गणी मिळविली व अजूनही शाळेसाठी मदतीचा ओघ सतत सुरूच आहे.गोरगरीब आदिवासी मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी पुढे आलेल्या हातांचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.