विनापरवानाच उभारले मोबाईल चे टॉवर?


 तेल्हारा प्रतिनिधी:- अर्जुन खिरोडकार.

कोणतेही मोबाईल टॉवर उभारताना ते परवानगी शिवाय उभारता येत नाही परंतु अत्यावश्यक असणाऱ्या परवानग्या न घेताच मोबाईल टॉवर उभे केल्याची धक्कादायक घटना हिवरखेड नजीकच्या झरी येथे घडली आहे. दिवसाढवळ्या विनापरवानगी मोबाईल टॉवर चे काम पूर्णत्वास नेण्यास ग्रामपंचायतची मूकसंमती असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.सविस्तर असे की झरी बाजार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समावेश असणाऱ्या दिवाणझरी येथे एका मोबाईल कंपनीचे टॉवर ग्रामपंचायतची आणि वन विभागाची परवानगी न घेताच पूर्णत्वास जात असल्याचे पहावयास मिळत असून अवैधपणे सुरू असणारे या मोबाइल टॉवरचे काम त्वरित थांबवावे अशी लेखी तक्रार ग्रामपंचायत आणि वन विभागाकडे करण्यात आली आहे. सदर तक्रारीवरून ग्रामविकास अधिकाऱ्याने सदर टॉवरला ग्रामपंचायतची परवानगी नसल्यामुळे ह्या टॉवरचे बांधकाम बंद करण्यात यावे व काम बंद केल्याचा अहवाल ग्रामपंचायतला सादर करण्यात यावा. अशी नोटीस शेत मालकाला दिली आहे परंतु सदर नोटीस मध्ये हे काम कधी पर्यंत बंद करण्यात यावे या कालावधीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे या टॉवर बाबत ग्रामपंचायतच्या मवाळ भूमिकेबद्दल तक्रारदाराच्या आणि जागरूक नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. एकीकडे विना मुदतीची थातूरमातूर नोटीस द्यायची व दुसरीकडे तक्रार आल्यानंतर सभा घेऊन विनापरवानगी टॉवरला परवानगी देण्याचा प्रयत्न तर ग्रामपंचायत करीत नाही ना? अशी भीती सुद्धा तक्रारदाराने व्यक्त केली आहे.दुसरीकडे वन विभागाच्या आकोट कार्यालयात तक्रारदाराने 21 सप्टेंबर रोजी अर्ज दिलेला असून अनेक दिवसपर्यंत त्या अर्जावर कोणतीही कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. नंतर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दि 8 ऑक्टोबर रोजी एका नोटीस द्वारे टॉवर कंपनीच्या अधिकाऱ्याला दि 13 ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रे घेऊन बोलावण्यात आले आहे. अशी गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.ह्या दोन्ही विभागांची कोणत्याही प्रकारची परवानगी मिळालेली नसताना ह्या टॉवरचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे आतापर्यंत ग्रामपंचायत ने झोपेचे सोंग घेतले होते का? असा प्रश्न सुद्धा तक्रारदाराने उपस्थित केला आहे. आता वनविभाग आणि ग्रामविकास अधिकारी यांचेकडून नोटीस मिळाल्यानंतरसुद्धा संबंधित टॉवरचे काम बेधडकपणे सुरूच असल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे त्यामुळे ह्यांना अभय कुणाचे असा प्रश्न पडला आहे. 

प्रतिक्रिया:-

ग्रा.पं. परवानगी विना टॉवर निर्मितीची लिखित तक्रार प्राप्त  झाल्यानंतर शेतमालकांना नोटीस देऊन काम बंद करावे व तसा अहवाल देण्याबाबत सूचित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेणार आहे.

नितेश महल्ले, ग्राम विकास अधिकारी झरी बाजार.

Previous Post Next Post