-महिलांनी सकस व विषमुक्त आहारासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी-- कृषी शास्त्रज्ञ विकास जाधव.


 जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-

आजकाल बाजारपेठेमध्ये सर्वत्र रासायनिक कीटकनाशके फवारलेला विषारी भाजीपाला, अन्न मिळते. त्याचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी महिलांनी आपल्या शेतामध्ये जैविक कीटकनाशकांचा व खतांचा वापर करावा, सुदृढ आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, महिलांनी सकस आहार व विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ विकास जाधव यांनी केले. ते के.व्ही.के.च्या वतीने आयोजित जागतिक अन्न दिनाच्या कार्यक्रमात दिनांक १६ ऑक्टोबर रोजी बोलत होते. वरवट ग्रामपंचायतचे सरपंच सौ प्रतिभाताई इंगळे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, माजी सभापती सौ नंदाताई हागे, उपसरपंच प्रभाताई डाबरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता इंगळें यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रत्येकाच्या घराभोवती मोकळी जागा अंगण असतेच, ह्या अंगणामध्ये, परसबागेमध्ये महिलांनी बगीचा निर्माण करून भाजीपाल्याचे उत्पादन काढावे आणि आपल्या दैनंदिन आहारात ह्या विषमुक्त भाजीपाला चा वापर करावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे ह्या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शामसुंदर बोर्डे यांनी सांगितले. महिला ह्या आपल्या कुटुंबाचा कणा असून त्यांनी कुटुंबाच्या सदस्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देऊन आपले कुटुंब आरोग्यदायी व सुदृढ ठेवावे, असे यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रतिभाताई इंगळे यांनी सांगितले.या कार्यक्रमाला संविधान ग्रामसंघ, गजानन महाराज ग्रामसंघ , नागेश्वर महाराज ग्रामसंघ व सप्तशृंगी ग्रामसंघ  यांचे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कृष्णा देशमुख प्रभाग समन्वयक उमेद यांनी केले.

Previous Post Next Post