जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव (जामोद)तालुक्यातील सातळी ह्या गावचा रस्त्याचा प्रश्न पंचवीस वर्षापासून प्रलंबित असून ह्या ग्रामस्थांनी सातत्याने उपोषणे ,आंदोलने केली. तरी प्रश्न निकाली निघाला नाही दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आलेल्या पुरानंतर गावचा इतर गावांशी दळणवळणाचा संपर्क तुटला. गावातील वृद्ध रुग्णांना गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात नेले. गावचा आरोग्याचा, शिक्षणाचा व बाजारपेठेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अशातच दिनांक 18 ऑक्टोबर पासून गावचे सरपंच पती जंगलीमन रायपुरे, युवा सेनेचे अक्षय पाटील, महादेव भालतडक यांनी नदीपात्रातच उपोषण आरंभ केले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस संपला तरी प्रशासनाने कसलीही दखल घेतली नाही .उपोषण कर्त्यांच्या तब्बत तीसुद्धा खालावल्याचे कळते.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असलेल्या ह्या रस्त्याच्या बांधकामासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने सदरचे शेतकरी हे रस्त्यासाठी जमीन देत नाहीत. संबंधित शेतकऱ्याला त्याचा शेताचा मोबदला मिळेपर्यंत बांधकाम विभागाने सदर रस्त्यावर काम करू नये असे निर्देश सुद्धा न्यायालयाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेले आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून संबंधित भूमी अधिग्रहणाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे दाखल झाला आहे की नाही? याचीसुद्धा ग्रामस्थांना कल्पना नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच सातळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग समोर भरपावसात ठिय्या आंदोलन केले होते . संबंधित रस्त्याचा अधिग्रहणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढून संबंधित शेतकऱ्याला जमीनीचा मोबदला द्यावा. आणि ह्या रस्त्यावर फुलाची बांधणी करून कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा ,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली. त्यांनी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. ह्या विषयी आपण उद्या प्रत्यक्ष उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार शितल सोलाट ,जिप बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यु.पी. बुरजे यांच्या सोबत प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याचेही यावेळी प्रशांत डिक्कर यांनी उपोषण करतांना सांगितले.