मेळघाटात होणार आरोग्य केंद्र शासनाकडून चार आरोग्य केंद्र व तेरा उपकेंद्रे मंजूर...


 राजु भास्करे /चिखलदरा

मेळघाटात या आदिवासी भागामध्ये कुपोषण व इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाकडे चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व तेरा उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. आता लवकरच ही आरोग्य केंद्रे सुरू होणार असल्याने माता व बालमृत्यूला देखील आळा बसेल तसेच कुपोषण रोखण्यासाठी मदत मिळणार आहे.मेळघाटात डॉक्टर व इतर कर्मचारी उपलब्ध करणे तसेच आरोग्यसेवेचे बळकटीकरण करण्याकरिता नवीन आरोग्य केंद्रांची स्थापना करणे शासनाला आवश्यक वाटत होते. शिवाय जनतेचीही मागणी होती. मेळघाट हा भाग डोंगराळ व दुर्गम आहे. या परिसरात जनतेला तत्परतेने आरोग्य सेवा पुरविण्याकरीता तसेच मातामृत्यू बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील प्राथमिक स्तरावरच्या उपाययोजना करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मेळघाट या भागातील धारणी तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व तेरा उपकेंद्र तर चिखलदरा तालुक्यात दोन आरोग्य केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. धारणी तालुक्यातील टिंटबा व चाकर्दा या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर बिबामल, खापरखेडा, हिराबंबई, राजापूर, भोंडीलावा, कसाईखेडा, ढाकरमल, आकी, बारु, बोरी, हरीसाल, चेंडो, उतावली इत्यादी ठिकाणी उपकेंद्र होणार आहे. शिवाय चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार व आवागड या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणार आहे. त्यामुळे आदिवासी रुग्णांची पायपीट थांबणार आहे.-

---------------------------------------

15 जानेवारीच्या निर्णयानुसार टिंटबा, चाकर्दा, गौलखेडा बाजार, आवागड या चार ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र होणार आहे. निधी आल्यावर लवकरच काम सुरू होईल. यामुळे बालमृत्यू, मातामृत्यू कमी होईल व संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढेल.

डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

----------------------------------------

मि निवडून आलो तेव्हा पासून प्राथमिक आरोग्य केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश मिळाले असुन आता मेळघाटाची आरोग्य सेवा सुधारणार आहे. तसेच याठिकाणी उच्चशिक्षित डॉक्टर,नर्स नियुक्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

राजकुमार पटेल

आमदार मेळघाट

Previous Post Next Post