लेकराची वंदना
आज घे ओथंबलेल्या
अंतरांची वंदना....
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभापेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्या, पिचलेल्या, मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उद्धार आहे, आणि तेही शिक्षण सर्वोच्च शिक्षण असले पाहिजे. उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित व कष्टप्रतच राहील. उच्च शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे , ते बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकांना सुद्धा संधी मिळायला हवी. असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच १९५६ साली औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती.१९५६ मध्ये हैद्राबाद सरकारकडे औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापणेची मागणी करण्यात आली होती.ही मागणी करणाऱ्यांमध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ,नेते व कार्यकर्ते होते.त्यामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह दत्तो वामन पोतदार,लक्ष्मणशास्त्री जोशी, डाॅ.धनंजय राव, आर.गाडगीळ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू एम.आर.जयकर यांचा समावेश होता.१७ सप्टेंबर १९५६ नंतर मराठवाडा हा विभाग भाषावर प्रांतरचनेनुसार महाराष्ट्रात विलीन झाला. त्यानंतर अल्पावधीतच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. २७ एप्रिल १९५७ साली मुंबई राज्याच्या विधीमंडळाने न्या.पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विद्यापीठ समिती स्थापण केली. या समितीत सुंदरराज डोंगरकेरी, भाऊसाहेब वैंशपायन, शेंदारकर, सेतू माधवराव पगडी व प्राचार्य म.भि.चिटणीस यांचा समावेश होता. या समितीने विद्यापीठ स्थापणेच्या वेळी मराठवाडा,अजिंठा, देवगिरी, शालिवाहन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इ. नावे विद्यापीठास सुचविले होते. विद्यापीठ स्थापणेच्या काळातच प्राचार्य म.भि.चिटणीस यानी या विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची सूचना केली.मात्र या सर्व नावांमधून मराठवाडा हे नाव देण्याचे ठरले. २३ आॅगस्ट १९५८ ला विद्यापीठाची कायदेशीररित्या स्थापणा करण्यात आली. उदघाटक म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हजर होते. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून सुंदरराज डोंगरकेरी यांची तर कुलसचिव म्हणून प्राचार्य मनोहर भिकाजी चिटणीस यांची नियुक्ती करण्यात आली. १९७४ साली विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी लेखी मागणी पत्राद्वारे सर्वप्रथम प्राचार्य मच्छिंद्र वाहूळ यानी केली.२७ जुलै १९७८ ला महाराष्ट्राच्या विधीमंडळात तत्कालीन पुलोद सरकारने मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.आणि सुरू झाली मराठवाड्यात दलित बौद्धांची घरे जाळण्याची एक मालिका.
नामांतर हे व्हावे म्हणून कितीतरी ते मेले,
परंतु स्वस्थ बसले नाही भीमरावांचे चेले,
आणि अनेक गौतमांनी आत्मदहन ते केले,
बोलिदान त्या नर वीरांचे वाया नाही गेले....
मनुवादी लोकांनी या ठरावाला विरोध केला. तरीपण आंबेडकरी जनता या विरोधाला जुमानली नाही. त्यांनी नामांतराची लढाई चालूच ठेवली. या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. आंबेडकरी समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी वाटेल ते करायला तयार होता. नामांतराची लढाई ही दीन-दलितांच्या अस्मितेची लढाई होती. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवाद्यांनी अत्याचारची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही पुरुष, महीला, वृद्ध यांच्यावरही लाठीचार्ज केला, तर काही वेळा बंदुकीचा ही वापर करण्यात आला. 'आईचं लेकरू आईविना पोरकं' या सारखी अवस्था त्याकाळी आंबेडकरी अनुयायांची झाली होती. गावोगावी, शहरात नामांतर लढ्याची ठिणगी पेटतच चालली होती. जिकडे-तिकडे सर्वांच्या ओठावर एकच वाक्य होते, 'नामांतर झालेच पाहिजे'. नांदेड मधील गौतम वाघमारे या आंबेडकरी तरूणाने सरकार नामांतर करत नाही म्हणून भर चौकात जाळून घेतल. अखेरचा एकच नारा होता तो म्हणजे नामांतर झाले पाहिजे. बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणांचे बलिदान केले. परभणी जिल्ह्यातही पोचीराम कांबळे यांचेही हात पाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानाने हाल हाल करून ठार मारले. जनार्दन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी आंबेडकर तरुण-तरुणी नामांतर लढ्यात शहीद झाले. सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंग मार्च आयोजित केला. जिंकू किंवा मरू, जळतील नाहीतर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंग मार्च मधील सहभागी लोकांवर सुद्धा क्रूरपणे लाठीहल्ले केले. काही ठिकाणी तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. कित्येक निरपराध लोकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप लोकांचा गुन्हा काय, तर आपल्या पित्याचे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला द्यावे हीच एक रास्त मागणी. नामांतराचा प्रश्न अजूनच वाढत चालला होता. या सर्व गोष्टीचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांना समजले की बाबासाहेबांची लेकरे बाबासाहेबांच्या नावासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. सतत १७ वर्ष चाललेल्या संघर्ष, मोर्चे, आंदोलने अन बलिदानाला अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी यश आले.अखेर झाला तो नामविस्तार ,नामांतर नव्हे अन तो ही मराठवाड्यातच दुसरे विद्यापीठ स्थापण करून.अखेर 14 वर्षानंतर स्वप्न झाले साकार, मराठवाडा विद्यापीठाचा झाला नामविस्तार.....
लेखक
अमरदीप सुरेश इंगळे
रा. कदमापूर ता.खामगाव जि.बुलढाणा सामाजिक कार्यकर्ते,
सचिव, यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कदमापूर.