अंबरीष पुंडलीक यांच्या 'सुभाष बावनी'चे प्रख्यात लेखक-निरूपणकार सच्चिदानंद शेवडेंच्या हस्ते प्रकाशन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा इंडिया गेटवर उभारून, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सुरुवात नेताजींच्या जन्मदिवसापासून करून नेताजींच्या पराक्रमाला एका बहुप्रतिक्षित उंचीवरून आदरांजली वाहिली जात असताना 'सुभाष बावनी' हे जळगाव जामोद येथील लेखक अंबरीष पुंडलीक यांनी लिहिलेले आणि मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक प्रख्यात लेखक-निरूपणकार सच्चिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोदमध्ये नेताजींच्या १२५ व्या जयंतीदिनी प्रकाशित झाले.नेताजींच्या स्वातंत्र्यप्राप्तीतील योगदानाबद्दल स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भारतीयांना माहिती नाही, तसेच त्यांच्या विमान अपघातानंतरच्या आयुष्याबद्दलही आपण अजूनही अनभिज्ञ आहोत, या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत, कमी शब्दात वाचकांना माहीत व्हाव्यात यासाठी या पुस्तक लेखनाचा संकल्प केल्याची भावना लेखक अंबरीष पुंडलीक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. तसेच 'कुठल्याही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास हा देशभक्तांचे रक्त सांडल्याशिवाय घडलेला नाही' या जागतिक सत्याचा उच्चार करून 'भारताच्या स्वातंत्र्यासाठीही लक्ष लक्ष अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस पहायला मिळाला' असे प्रेरणादायी विचार मांडून आपल्या ओजस्वी वाणीने प्रमुख अतिथी-वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी जमलेल्या वाचक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.जळगाव शिक्षण मंडळ द्वारा संचालित द न्यू इरा हायस्कूलच्या प्रांगणात हा प्रकाशन सोहळा कोरोना काळातील अटींचे पालन करून संपन्न झाला. यावेळी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिलजी जयस्वाल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ राठोड सर यांनी, तर प्रास्ताविक-परिचय द न्यू इरा हायस्कूलचे प्राचार्य श्री. अविनाश कुलकर्णी सरांनी केले.कार्यक्रमाची सांगता किरण सोहळे यांनी गायलेल्या वंदे मातरम् ने झाली.

Previous Post Next Post