चायनीज ओपो ब्रॅण्डच्या नवीन के 10 सिरीजची फक्त विदेशी ई कॉमर्स कंपन्यांमार्फत ऑनलाईन विक्री....


सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी--

सात वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेल्या चायनीज ओपो कंपनीला देशभरातील रिटेलर्सनी सहकार्य करून देशातील क्रमांक एकचा मोबाईल ब्रॅण्ड बनवले. मात्र आता ओपो कंपनीने रिटेलर्सना उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबत आपल्या नवीन के 10 सिरीजचे स्मार्टफोन थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लाखो मोबाईल रिटेलर्स देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे सर्व नियम धुडकावत चायनीज कंपन्या अनुचित व्यापार करीत असल्याने मोबाईल रिटेलर्स आक्रमक झाले आहेत. देशभरात दि.27 एप्रिल रोजी रिटेलर्स ओपोच्या डिस्ट्रीब्युटर तसेच कंपनी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशने चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय विरवानी यांनी दिली.भारतात लॉंचींगच्या वेळी ओपोला रिटेलर्सनीच मोठे सहकार्य केले. ग्राहकांपर्यंत ओपो मोबाईल पोहचविण्यासाठी आवश्यक प्रमोशन केले. त्यांच्या प्रतिनिधींना रिटेलर्सनी आपल्या काउंटरवर जागा दिली. मोठे डिस्प्ले लावून ओपोला प्राधान्यक्रम दिला. त्यावेळी कंपनीने रिटेलर्सलाच कायम प्राधान्य राहिल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात आता मोठा ब्रॅण्ड झाल्यावर ओपोने धोरण बदलून रिटेलर्सचा विश्वासघात केला आहे. ओपो 10 के सिरीजचे स्मार्टफोन कंपनीने फक्त ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांचेही मोठे नुकसान होणार आहे. भारतात ग्राहकांना विश्वासार्ह सेवा हवी असते जी फक्त रिटेलर्सच देवू शकतात. त्यांना वस्तू घेताना बारकाईने निरखून पारखून घ्यायची असते. अशावेळी ते विश्वासाने आपल्या नजीकच्या रिटेलर्सकडे येतात. मात्र ओपोसारखी चायनीज कंपनी नवीन स्मार्टफोन फक्त ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवून चुकीचा पायंडा पाडत आहे. विदेशी ई कॉमर्स कंपन्यांना माल देवून भारतीय रिटेलर्सचा विश्वासघात करण्याचे कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी रिटेलर्स आक्रमक झाले आहेत. चायनीज ओपो कंपनीने नवीन के सिरीजचे किमान 80 टक्के स्मार्ट फोन मेनलाईन रिटेलर्सना उपलब्ध करून देण्याची मागणी उपोषण आंदोलनावेळी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मोबाईल विक्रेत्यांनी 27 एप्रिल रोजी स्थानिक पातळीवर पोलिस यंत्रणेची रितसर परवानगी घेवून ओपो डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयाबाहेर शांततामय व लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करावे, असे आवाहन अजित जगताप यांनी केले आहे. उपोषणानंतरही कंपनीने योग्य दखल न घेतल्यास आणखी आक्रमक पध्दतीने कंपनीच्या चुकीच्या धोरणाला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Previous Post Next Post