सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण---
*मैं हिन्दू हु, तू है मुसलमान, हम दोनो भी हैं इंसान..*
*अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान...*
*एक थाली में खाना खाये सारा हिन्दुस्तान....*
या ओळीप्रमाणे हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील गुप्तेश्वर महाराज यात्रेत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन बघावयास मिळाले.सिरसोली येथील गुप्तेश्वर महाराज यात्रा महोत्सव अत्यंत आनंद उत्साहात पार पडला. यावेळी येथील मुस्लीम बांधवांनी मस्जिद समोर यात्रेत सहभागी भक्त मंडळींना शरबत व पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था केली होती. सदर यात्रेत अनेक भजनी मंडळे सहभागी झाली होती. मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेला गुप्तेश्वर यात्रा महोत्सव दोन वर्ष कोरोनामुळे पूर्णपणे बंद होता पण या वर्षी आयोजित यात्रा महोत्सवात शिवपुराण कीर्तन इत्यादी अनेक कार्यक्रम पार पडले. तर रथयात्रेत देवरी, पळसोद, उमरा, दानापूर, नेव्होरी यासह अनेक गावाच्या भजन मंडळींनी सहभाग घेतला होता. रथयात्रेस सकाळी 11 ते संध्याकाळी 7 असा वेळ लागल्याने आणि उन्हाचा वाढता पारा पाहून भाविकांनी भक्तांसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सोबतच यावर्षी येथील मुस्लीम बांधवांनी मस्जिद समोर शरबताचे वाटप केले. सदर यात्रेकरिता हिवरखेडचे नूतन ठाणेदार विजय चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळी सात वाजता गोपालकाला पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. येथील महाप्रसाद मध्ये घोळीची भाजी मुख्य वैशिष्ट्य असते. सहभागी भजन मंडळी मधून प्रथम येणाऱ्या भजन मंडळाला सात हजार, द्वितीय येणाऱ्यास पाच हजार, तिसऱ्यास तीन हजार, तर चौथे बक्षीस दोन हजार रुपये देण्यात आले. उर्वरित भजनी मंडळींना पंधराशे रुपये प्रमाणे मानधन देण्यात आले. सदर बक्षीस वितरण मा. आमदार वसंतराव खोटरे, रामप्रभू तराळे, डॉ. संदीप इंगळे, रामधन कोल्हे, हरिभाऊ राऊत, डॉ. ज्ञानेश्वर राऊत, गजानन उगले, सुरेश वाघमारे, भीमराव नागमते, भीमराव गावंडे, इत्यादींच्या हस्ते पार पडले. सदर यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला.