प्रतिनिधी:-प्रशांत भोपळे.
हिवरखेड येथील वादग्रस्त गोवंश प्रकरणाचा तपास एलसीबी कडे देण्यात आला आहे. एलसीबी कडे तपास येताच या प्रकरणाच्या तपासात गती आली असून गोवंश तस्करांनी 40 पैकी 36 गोवंश पळवून नेले होते त्यापैकी 9 गोवंश जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीचा शोध युद्धस्तरावर सुरू असल्याची चर्चा आहे.दिनांक 9 एप्रिल रोजी हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर परिसरात शेतकऱ्यांनी आणि गोरक्षकांनी 40 अवैध गोवंश दिसल्यावरून पोलिसांना माहिती दिली होती. सदर 40 गोवंश हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पोलिसांच्या विनंती वरून , बजरंग दलाचे कार्यकर्ते व शेतकरी युवक पोलिसांच्या सोबतीने गुरांना हिवरखेड पोलीस ठाण्यात आणत असताना सोनवाडी फाट्याजवळ गोवंश तस्करांनी मोठा जमाव आणून गोरक्षकांवर आणि पोलिसांवर हल्ला करून 40 पैकी 36 गोवंश घेऊन पसार झाले होते. यावेळी झालेल्या मारहाणीत अनेक गोरक्षक जखमी झाले होते तर दुसऱ्या गटातील एक व्यापारी सुद्धा जखमी झाला होता. 40 पैकी फक्त 4 गुरेच पोलीस ठाण्यात सुखरूप आणली गेली होती. तत्पूर्वी पशुप्रेमींनी दिनांक ९ च्या रात्री दोन वाजता पोलिसांना गोवंशाचे तस्करी होत असल्याची माहिती सुद्धा दिली होती . परंतु एवढे गंभीर प्रकरण असूनही ठाणेदार स्वतः घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांचा स्टाफ कमी असल्याने घटनास्थळी फक्त तीनच पोलीस गेले होते. पशुप्रेमींनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केले. आणि या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव सुद्धा सांगितले व 40 गोवंश पकडल्यावर तो सूत्रधार हजर असतानाचा व्हीडिओ सुद्धा दाखविल्याचे म्हटले. परंतु उलटपक्षी गोरक्षकांवरच गुन्हे दाखल झाले होते. दुसरीकडे हल्ला करणाऱ्या मोठ्या जमावापैकी फक्त 7 जनांवरच गुन्हे दाखल झाले. नंतर 10 तारखेला आणखी 7 जणांवर प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले होते. परंतु इतर हल्लेखोर व मुख्य सूत्रधार आरोपीवर कोणतीच कार्यवाही झाली नव्हती.गोरक्षकांवरील हल्ला प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करावी, गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी करीत घटनेच्या निषेधार्थ अकोला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता तसेच विविध स्तरावर तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या.या निषेधार्थ बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी जाहीर निषेध पुकारला. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असताना हिवरखेड येथील वादग्रस्त गोवंश प्रकरणाचा तपास एलसीबी कडे देण्यात आला आहे. एलसीबी कडे तपास येताच या प्रकरणाच्या तपासात गती आली असून गोवंश तस्करांनी 40 पैकी 36 गोवंश पळवून नेले होते त्यापैकी 9 गोवंश जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आता मुख्य सूत्रधार असलेल्या आणि घटनास्थळावरील व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात एलसीबी ला यश येते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.