अवैध रेती तस्करी ने घेतला बळी--पद्माकर गावंडे यांचा वाहनाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू...


जळगाव जामोद प्रतिनिधी:-

पूर्णा नदी परिसरात सध्या रेती तस्करी ला उधाण आले आहे. मूळ लिलाव झालेल्या घाटातून अधिकृत रित्या रेती वाहतूक करण्याला रॉयल्टी लागते. त्यामुळे माहूली या घाटातून महसूल विभागाच्या आशीर्वादाने अवैध रेती तस्करी जोमात सुरू आहे. अवैध तस्करांचे संघटन झालेले असून महसूल चे तलाठी व कर्मचाऱ्यांचे त्यांना पाठबळ आहे अशातच दिनांक १४ मे रोजी सकाळी पाच वाजे दरम्यान टाकळी (पारसकर) नजीक पद्माकर मधुकर गावंडे वय ४५ या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने चिरडून टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याचा मृत्यू हा अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनाने झाला असला तरी प्रशासन मात्र वास्तव लपवीत असून अज्ञात का विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मौजे सातळी येथील रहिवासी असलेले पद्माकर मधुकर गावडे हे सकाळी पाच वाजता दरम्यान आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जात असता  रेती वाहतूक करणार्‍या अज्ञात टिप्पर किंवा ट्रॅक्टर ने त्यांना ठोस मारली, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत वाहनधारकाने बाजूला गवत कचऱ्यामध्ये लपवून ठेवले व तो वाहन घेऊन पसार झाला. विठ्ठल ज्ञानदेव मालठाणे यांनी जळगाव पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार दाखल केली असून पद्माकर गावंडे माझे मेव्हणे असून त्यांचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे.तरी पोलीस प्रशासनाने याकामी लक्ष घालून तपास करावा व पद्माकर गावंडे यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा विठ्ठल मालठाणे यांनी केली आहे.

------------------

-------------------------------------------------------

जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीतील चार रेती घाटांचा अधिकृतरित्या लिलाव झालेला आहे. शहरातील सुशिक्षित बेरोजगार  युवकांनी रोजगार मिळण्यासाठी संबंधित घाटांची लाखो रुपयात लिलावात बोली केली. लक्षावधी रुपये  घाटात गुंतवून अवैध रेती तस्करी करणारे महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे देऊन लिलाव न झालेल्या घाटातील रेती उचलतात. त्यामुळे अधिकृत घाटातील रॉयल्टी कोणी घेत नाही. म्हणून ज्यांनी हे अधिकृत घाट लिलावात बोली बोलून घेतले त्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. जेवढे पैसे शासकीय तिजोरीत भरले असतील तेवढे पैसे सुद्धा घाट घेणाऱ्यांचे वसूल होत नाहीत, अशी त्यांची व्यथा आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार अवैध रेती तस्करी ची बाब निदर्शनास आणून देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी सुद्धा कारवाई करत नाहीत ,अशी त्यांची खंत आहे. परंतु अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे एक रॅकेट, संघटन असून त्यांना रॉयल्टी घेऊन रेती वाहतूक केल्यापेक्षा महसूल प्रशासनाला हाताशी धरून नाम मात्र हप्ता देऊन ज्या घाटंचा लिलाव  झालेले नाही अशा घाटातून रेती वाहतूक करणे परवडते. त्यामुळे संपूर्ण रात्रभर हे वाहनधारक रेती वाहतूक करतात. पोलिस येतील का, तहसीलदार येईल का ?या भीतीने रेती वाहतूक करणार्‍या वाहनांचे ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत असतात. अशातच माहुली घाटातून रेती भरून येणाऱ्या वाहनाने पदमाकर गावंडे यांना चिरडून टाकले असावे ,असा संशय व्यक्त केला जात आहे.उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार शीतल सोलाट, ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी ह्या प्रकरणी लक्ष कालू घालून मृतक पद्माकर गावंडे यांच्या परिवाराला न्याय देण्याची मागणी होत आहे. 

---------

आरोपी लवकरच ताब्यात येईल: ए.पी.आय. चौधरी

पद्माकर गावंडे यांचा काल अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला असला तरी एवढ्या सकाळी पाच ते साडेपाच दरम्यान कोणते वाहने त्या रस्त्याने जातात याचा तपास आम्ही करीत आहोत. रेतीच्या वाहनानेच संबंधित गावंडे यांना धडक देऊन वाहनचालक वाहनसह पसार झालाय ,अशी या परिसरात सुद्धा चर्चा आहे. पोलीस यंत्रणा कालपासून पूर्ण तपास करीत आहे. लवकरच संबंधित आरोपी व वाहन पोलिस ताब्यात घेतील असा आशावाद ए.पी.आय.चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

------------

Previous Post Next Post