अकोट,ता.२९-अकोटचे प्रथितयश व्यापारी संजय विरवाणींचे अवघे विश्व त्यांचा चिमुकला कबीर(वय-नऊ)मध्ये सामावलेले होते.हेमोलाईटिक युरीमिक सिंड्रोम या असाध्य आजाराने कबीरला ग्रासल्यावर विरवाणींनी घाबरुन न जाता अखेरपर्यंत या आजाराविरुध्द लढा देत सर्वोत्तम उपचार केले.अखेर मृत्यूने आपला डाव साधलाच.परंतू कोलमडून न जाता एका क्षणात नेत्रदानाचा निर्णय घेऊन विरवाणींनी डोळ्यांच्या रुपात कबीरला जिवंत तर ठेवलेच;त्याशिवाय असाध्य आजारावर काही प्रमाणात मात केल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. मोठेपणी आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या व अभ्यासात हुशार असलेल्या कबीर विरवाणीच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारासह समाजमनामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कबीर,हा स्थानिक सिंधी वसाहतीतील रहिवासी व आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांचा लाडका पुत्र होता.तो शहरातील दी विद्यांचल स्कूलचा तिसऱ्या स्टँडर्डचा हुशार विद्यार्थी होता.त्याला हेमोलाईटिक युरीमिक सिंड्रोम(एचयूएस)या अंत्यंत दूर्मिळ व असाध्य आजाराने ग्रासल्याचे विरवाणींच्या गत फेब्रुवारी महिन्यात लक्षात आले.त्यांनी अकोट,अकोल्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला या आजाराचे नेमके निदान झाले.आजाराचे भयंकर स्वरुप कळल्यावरही विरवाणी डगमगले नाहीत.त्यांनी कबीरला नागपूरला सुपर स्पेश्यालिटी रुग्णालयात अत्याधुनिक उपचारार्थ भर्ती केले.दिवसाला हजारोंचा खर्च पुढे लाखोत यायला लागला.जवळची होती नव्हती ती सर्व जमापुंजी औषधोपचारार्थ खर्च झाली.मित्रपरिवार व दानशुरांनीही आर्थिक मदत केली.उपचारादरम्यान रुग्णालयच कबीरचे घर झाले होते.बोलक्या स्वभावाने कबीर डॉक्टरांसह सर्वांचा प्रिय झाला होता.परंतू जो आवडे सर्वांना;तोची आवडे देवाला,या उक्ती प्रमाणे अखेर देवाज्ञा झालीच.तब्बल पाच महिने पाच दिवस प्रयत्नांची शर्थ झाल्यावर सोमवारी,२७ जूनला सकाळी कबीरची प्राणज्योत मालवली.लाडक्या मुलाच्या निधनाने विरवाणी कोलमडले नाहीत.तर त्यांनी कबीरला जिवंत ठेवण्यासाठी त्याचे अंगदान करण्याचा क्षणात निर्णय घेतला.कबीरचे डोळे सुस्थितीत असल्याने नेत्रदानाचा निर्णय घेण्यात आला.नागपूरच्या सोमलवाडा येथील चिंतामण नगरातील महात्मे आय बँक-आय हॉस्पिटलमध्ये हे नेत्रदान करण्यात आले.या नेत्रदानामुळे कबीर किमान,डोळ्यांच्या रुपाने का होईना हे सुंदर जग पुन्हा पाहणार असल्याने संजय विरवाणींचे समाधान झाले.त्यांना या आय बँके तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.या पूढील आयूष्यात अंगदानाचा संदेश देण्यासाठी नेहमी प्रयत्नरत राहणार असल्याचे विरवाणी यांनी सांगितले.मुळातच सामाजिक कार्यकर्ते असलेल्या विरवाणी यांनी मुलाच्या उपचारादरम्यानही अकोट व नागपूरला रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते.सोमवारी रात्रीला अकोटच्या पोपटखेड मार्गावरील हिंदू स्मशानभूमित कबीरच्या पार्थीवावर समाजबांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कबीरच्या संवंगड्यांचे डोळे पाणावले
कबीर अभ्यासासोबत खेळामध्येही रमायचा.त्याच्या अचानक निघून जाण्याचा धक्का त्याच्या मित्रमंडळींना सुध्दा बसला आहे.त्याच्या आठवणीने मित्रांचे डोळे पाणावले.कबीरचे आयपीएस होण्याचे स्वप्न त्याचा भाऊ पूर्ण करणार असल्याचे संजय विरवाणींनी सांगितले. कबीरच्या मागे त्याचे आई-वडिल,भाऊ,काका,संयुक्त कुटूंब असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी,२९ जूनला कबीरच्या स्मरणार्थ सिंधी वसाहतीतील शक्तीधाम मंदीरात सायंकाळी पाच वाजता पगडी रस्म आयोजित करण्यात आली होती.त्यात उपस्थितांनी कबीरला श्रध्दांजली वाहिली.
