मंगरूळ चवाळा येथील झोपडपट्टी रहिवासी पाण्यात; जनजीवन विस्कळित.प्रशासनाने तात्काळ मदत पोहचवावी...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

दि. 18 जुलै, मंगरूळ चवाळा: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील वार्ड क्र. १ मधील झोपडपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात लोक राहतात तिथे पाणी वाहून जाण्याची कुठलीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने प्रचंड प्रमाणात जलभराव झाला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. तेथील रहिवाशांनी वेळोवेळी पाणी जाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली परंतु पाणी जाण्यासाठी एखादा सिमेंट बंबा सुद्धा उपलब्ध करून दिला नाही. पण आता सद्या वरून मोठ्या प्रमाणात सततचा पाऊस सुरू आहे आणि आधीच खूप पाणी साचले आहे. तेथील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने खाण्यापिण्याची व इतर अनेक प्रकारची दुरावस्था झाली आहे. झोपडपट्टी मधील रहिवाशांनी वेळोवेळी तेथील पाणी वाहून जावे अशी मागणी केली होती. तेथील रस्त्यासाठी माजी आमदारांनी उद्घाटन सुद्धा केले होते. परंतु कायम दुर्लक्षीत प्रदेश म्हणूनच तेथील ओळख झाली आहे. मंगरूळ चवाळा वार्ड क्रं. १ मध्ये हरणी व झोपडपट्टी हा प्रदेश येतो पण झोपडपट्टी या प्रदेशाचा विकास कागदोपत्रीच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपडपट्टी आदिवासीबहुल प्रदेश असून इतर सर्वच समाजाचे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात. वेळोवेळी मागणी करूनही पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी करूनही तशी व्यवस्था का केली नाही? कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहिल्या जात आहे का? असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहे. दिनांक १७ जूलै च्या रात्रीपासून तेथील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. आणि दिनांक १८ जूलैला सुद्धा मोठ्या प्रमाणात एकसारखा पाऊस सुरूच आहे. अशा परिस्थितीत तातडीची मदत पोहचणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाने तातडीने मदत पोहचवावी आणि पाणी जाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे. मनोज गावनेर यांनी मा. तहसिलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्थानिकांच्या मदतीने आपण सद्या उद्भवलेल्या पूरपरिस्थिती वर मात करू शकतो असे सांगितले. सद्या त्याठिकाणी तलाठी असून ग्रामसेवक पोहचणार आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने साचलेले पाणी काढण्यासाठी स्थानिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

Previous Post Next Post