विज पडून निमकराड येथील दोघांचा मृत्यू तर एक महिला जखमी झाल्याने उपचारार्थ दाखल...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या निम कराड येथे काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. पाऊस आल्यामुळे निमकराड येथे शेत शिवारामध्ये काम करीत असणारे सहा ते सात जण एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली थांबले अचानक झाडावर वीज पडल्याने त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दादुलगाव तिवडी गौलखेड मांडवा आडोळ व निम कराड या परिसरामध्ये अचानक विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह अचानक पावसाला सुरुवात झाली.पावसात मोठ्या प्रमाणात विजा चमकत होत्या वादळीवारा सुरू होताच गट नंबर 102 मध्ये अमोल रघुनाथ पिसे वय 22 वर्ष शेतात काम करत होता. व त्याच बाजूला असलेल्या शेतामध्ये मधुकर तुळशीराम उगले वय 56 आणि त्यांची पत्नी यमुना मधुकर उगले वय 48 यांच्यासह आणखी चार जण हे पावसापासून बचाव व्हावा म्हणून शेतामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आसरा घेण्याकरिता गेले असता अचानक त्या झाडावर वीज पडली आणि झाडाखाली उभे असलेल्या अमोल पिसे आणि मधुकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना उगले ह्या जखमी झाल्या. तिघांनाही ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी अमोल रघुनाथ पिसे व मधुकर तुळशीराम उगले या दोघांना मृत घोषित केले. घटनेची फिर्याद सदर मृतकाच्या नातेवाईकांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिली असता, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून पंचनामा केला यावेळी पंचनामा करताना नायब तहसीलदार मार्तंड हे उपस्थित होते. पंचनामा होताच शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह कुटुंबाच्या हवाली करण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post Next Post