रद्द करा, रद्द करा, सरकारी शाळांचे खाजगीकरण आणि सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करा. अशा गगनभेदी घोषणा देत समनक जनता पार्टीने तब्बल अर्धा तास अकोला - हैदराबाद महामार्ग रोखून धरला. दिनांक 26 सप्टेंबर रोजी स्थानिक वसंतराव नाईक चौकात झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या चारही बाजूंनी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळा ह्या खाजगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 20 पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करुन त्या कॉम्प्लेक्स स्कूल मध्ये विलीन करुन छोट्या गावातील शाळांना कायमचे टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय काढला आहे. शिक्षण आणि नोकरी हे समस्त नागरिकांच्या प्रगतीचे द्वार आहे. हे द्वारच बंद करण्याचा षडयंत्रपूर्वक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात सर्व स्तरातून विरोध होत आहे. अशा परिस्थितीत समनक जनता पार्टीने सर्वप्रथम रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन झाले. प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या नेतृत्वात राज्यात विविध जिल्ह्यात आज रस्ता रोको आंदोलन केले गेले. वाशिम येथे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या नेतृत्वात स्थानिक वसंतराव नाईक चौक येथे रास्ता रोको करण्यात आला.सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू असतांनाही पक्षाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते शहरात दाखल झाले. अकोला नाका येथील जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढून वसंतराव नाईक चौक येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोल रिंगण करून चारही दिशेचे रस्ते रोखून धरले. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पी एस खंदारे यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. जय मानवता, जय संविधान, शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे रद्द करा, रद्द करा, शाळा बंदीचा कायदा रद्द करा, शिक्षण वाचवा, देश वाचवा आदी विविध घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, विभागीय महासचिव अनिल बळी, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शितल राठोड यांनी आक्रमकपणे भाषण करून शासनाच्या तुघलकी निर्णयाचा निषेध केला आणि सदर निर्णय मागे न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करू असा शासनाला इशारा दिला. यावेळी आमच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नका अशी अर्थ हाक छोटी विद्यार्थिनी कु. यशोमती गजानन धामणे हिने दिली. यावेळी शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी भर पावसात अर्धा तास कार्यकर्ते घोषणा देत होते. आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान अकोला - हैदराबाद महामार्गावर रस्त्याच्या दोन्हीही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त बजावला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारी शाळांच्या खाजगीकरणाविरोधात महामार्ग रोखला..समनक जनता पार्टी रस्त्यावर गगनभेदी घोषणा आणि भाषणाने बस स्टँड परिसर दणाणला..।
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
