अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कवठळ या गावामध्ये गणपती विसर्जन मिरवणूकी दरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी निचास पूरा येथे दुपारी तीन ते चार च्या सुमारास काही समाजकंटकांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या आरोपावरून कवठळ येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मिरवणूक ज्या ठिकाणी दगडफेक झाली होती त्या जागेवरच थांबून जोपर्यंत दगड फेक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई होत नाही, तोपर्यंत विसर्जन मिरवणूक काढणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. एक ते दीड तास पर्यंत गणेश मंडळाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने तेथेच बसून राहिले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहचल्यानंतर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर मिरवणूकीला पुन्हा सुरवात करण्यात आली,त्यानंतर चोख पोलीस बंदोबस्तात संध्याकाळी सहा वाजता मिरवणूक शांततेत पार पडली. सद्या गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.तामगांव पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील जवळपास 27 व्यक्तीवर गुन्हा दाखल असून सात आरोपी सध्या अटकेत आहे. पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसणे यांच्या मार्गदर्शनात तामगांव ठाणेदार प्रमोद उलेमाले हे करीत आहेत.
