जनुना येथे त्वरित बस सेवा सुरू करावी..अन्यथा रास्ता रोको आझाद हिंदचा इशारा...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
मोताळा तालुक्यातील ग्राम जनुना व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींंचे शालेय नुकसान थांबविण्यासाठी त्वरित जनुना येथील कायमस्वरूपी बस सेवा सुरू करावी. अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी वडीभस्मे बुलढाणा यांना निवेदनातून देण्यात आला आहे.या अनुषंगाने नुकतेच आझाद हिंद शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने बुलढाणा येथील परिवहन अधिकारी व संबंधितांसोबत चर्चा करून निवेदन सादर केले.बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोथळी, जनुना, तरोडा, जयपुर, शेंबा, नांदुरा मार्गे बस सेवा सुरू करावी. ज्यामुळे मोताळा तालुक्यातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींना बस सेवेचा लाभ होईल.मागील तीन वर्षापासून या अनुषंगाने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी परिवहन महामंडळाशी निवेदने देत मागणी केलेली आहे. असंख्य पत्रव्यवहार केलेले आहे. त्या अनुषंगाने संबंधांनी सर्वेही केला. काही दिवस बस सेवा सुरूही झाली. परंतु काही कालावधीनंतर पुन्हा बस सेवा बंद करण्यात आली. एसटी बसच्या या लपंडावामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शालेय नुकसान होत आहे. शेतकरी शेतमजुरांची ससेहोलपट होत आहे. सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाहक सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे. यावर त्वरित निर्णय घ्यावा बस सुरू करावी अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे, तालुका उपाध्यक्ष भगवान महाराज ठाकरे, महासचिव शेख अफसर, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गुणवंता पाटील, महिला तालुका उपाध्यक्ष मनोरमा डोफे, जिल्हा उपाध्यक्ष संजय डोफे, असलम शाह, सुरेखाताई निकाळजे यासह गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.