जळगाव जा. येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मंजूर...आ.डॉ. संजय कुटे यांच्या पाठपुराव्याला यश...
जळगाव तालुका प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाच्या 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत जळगाव जामोद येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सातपुड्याच्या कुशीत वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिले पाऊल पडले असून आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय असावे अशी बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. यासाठी आमदार डॉ. संजय कुटे यांनी राज्य शासनाकडे मागणी रेटून धरली होती. यासाठी आवश्यक जागेची व्यवस्था असल्याचे पत्र आमदारांनी सादर केल्याने अखेर 4 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव जामोदला मंजुरी देण्यात आली आहे.जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे दोन्ही तालुके सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. सातपुडा पर्वतामध्ये प्राचीन अशा आयुर्वेद वनस्पती आजही आहेत. त्याचे संशोधन आणि संगोपन या निमित्ताने होण्यास मदत होणार आहे. हे महाविद्यालय या भागाच्या भौगालिक परिस्थितीनुसार शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
___________________________
मतदार संघातील गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा घडावी या उदात्त हेतूने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक यश आले आहे. जनता जनार्दनाचे आशीर्वाद असल्याने विकासाच्या बाबतीत कुठल्याही क्षेत्रात मतदारसंघ मागे राहणार नाही. अशी बरीच कामे अजूनही करायची आहेत. जळगावसाठी राज्य शासनाने घेतलेला उपरोक्त जनहिताचा व आनंदाचा आहे. - डॉ. संजय श्रीराम कुटे, माजी कामगार मंत्री तथा आमदार जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ
.jpeg)