आदिवासी ग्राम निमखेडी येथे "शासन आपल्या सोबत साथी अभियान" जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...


आदिवासी ग्राम निमखेडी येथे "शासन आपल्या सोबत साथी अभियान" जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलढाणा तसेच क्रांतीसुर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था खेर्डा ,ता जळगाव जा ,यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी ग्राम  निमखेडी येथे स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शासन आपल्या सोबत साथी अभियान जनजागृती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  शाळा व्यवस्थापन समितीचे दादाराव बिबोकार तथा प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत उपसरपंच रवी बिबोकार, अंगणवाडीच्या ताई रेखा सोनवणे ,शालेय पोषण कर्मचारी सनबाई चोंगड ,शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे, सर्व शिक्षक तथा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी उपस्थितांना सदर अभियानाची स्थानिक भाषेत सविस्तर माहिती दिली. महिला व बालविकास विभाग यांच्याकडून अनाथ बालकांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा यासाठी एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे त्यानुसार महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अनाथ बालकांना विभागीय उपायुक्त यांचेमार्फत अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते.प्रसंगी अनाथ बालकांपर्यंत सदर  माहिती पोहोचविण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमासंदर्भात माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री अमोल डिघुळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री दिवेश मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.उपस्थितीतांचे आभार  शिक्षक धनराज इंगळे यांनी मानले तर अंगणवाडीच्या ताईंनी उपस्थितांकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post Next Post