युपीएससी उत्तीर्ण झालेल्या हरिष देशमुख यांचा मेहकरात सत्कार...वडिलांचे छत्र हरविल्यानंतरही मिळविले यश, आईकडील आजोबांनी ठेवला नातवाचा कौतुक सोहळा...


 
युपीएससी उत्तीर्ण झालेल्या हरिष देशमुख यांचा मेहकरात सत्कार...वडिलांचे छत्र हरविल्यानंतरही मिळविले यश, आईकडील आजोबांनी ठेवला नातवाचा कौतुक सोहळा...

सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

आजोबा तीन वेळा नगर परिषद अध्यक्ष, सलग दोनदा आमदार, अन् एक वेळा खासदारकी भूषविलेले…,वडील सुद्धा नगर परिषेदेचे गटनेते पद भूषविलेले, ते विविध मोठमोठे व्यवसाय अन् शिक्षणसंस्थांचे मालकही होते! अशी तगडी राजकीय, व्यावसायिक पाश्वर्भूमी असलेल्या सधन-सुखवस्तू कुटूंबातील युवक एकतर राजकारणी असेल किंवा तो विविध व्यवसाय सांभाळत शिक्षणसंस्थेचा मालक म्हणून समाजात मिरवत असेल, असे कोणालाही वाटेल; पण नाही. उपरोक्त कुटूंबातील युवकाने प्रचंड अभ्यास करुन युपीएस्सी उत्तीर्ण केली. त्या युवकाचे नाव आहे, हरिष संजयराव देशमुख. परभणी लोकसभा मतदार संघाचे शेकाप पक्षाचे माजी खासदार दिवंगत शेषराव देशमुख यांचे ते नातू होय, तर दिवंगत संजयराव देशमुख यांचे ते सुपुत्र होय. आजोबा आणि वडील राजकारणी असूनही नातवाने आणखी चॅलेंजिंग क्षेत्र निवडून त्यामध्ये यशस्वी व्हावे, ही कौतुकाचीच बाब.एमपीएस्सी, युपीएस्सी उत्तीर्ण होणं, ही काही साधी गोष्ट नाही. त्यासाठी करावा लागतो प्रचंड अभ्यास. ठेवावा लागतो प्रचंड संयम. अन मन, मेंदू, नजरेत कायम ठेवावं लागत ध्येय. त्यासाठी करावा लागतो अनेक गोष्टींचा त्याग. हे सर्व केलंय युवा व्यक्तिमत्त्व हरिष देशमुख यांनी! हरिष देशमुख हे दहावीत मेरीट आलेले, मॅट्रीकमध्ये अगदी शंभर पैकी शंभर टक्के गुण त्यांनी मिळविले. बाप रे…कीती ती तल्लख बुद्धी…! पुढे ते परभणीतच बारावी उत्तीर्ण झाले. त्यावेळी देखिल तब्बल 91 टक्के गुण मिळविले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सन 2017 मध्येच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अशातच, कोरोना काळ आला. अन् कोरोनामुळे त्यांचे वडील संजयराव देशमुख हे जग सोडून गेले. वडिल वारल्यानंतर हरिष देशमुख हे चांगलेच खचले. वडिल नुसते घरात जरी बसलेले असले, तरी खूप मोठा आधार असतो, अन् तो भरभक्कम आधारच संपला, तर कोणीही गलितगात्र होतो. तशीच परिस्थिती हरिष देशमुख यांची झाली. नातेवाईक अन् घरातील मंडळींना वाटायचे, की आता हरिष यांनी शिक्षणसंस्था व वडिलांनी उभे केलेले व्यवसाय सांभाळावेत अन् आईजवळ राहावे. दीड वर्ष ते घरी राहिले. पण मुलाने अधिकारी बनावे, हे वडिलांचे स्वप्न त्यांना पूर्ण करायची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी, त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केलाच. प्रचंड मेहनत घेतली. अन् यश मिळविलेच. हे उत्तुंग यश म्हणजे, त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफीसर (ईपीएफओ) या पदासाठी निवड झाली. अन् याचा सर्वाधिक आनंद त्यांच्या मातोश्री मेघाताई संजयराव देशमुख यांना झाला. मेघाताई ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शेलगाव देशमुख येथील संपतराव देशमुख यांची लेक आहेत. खरंतर, आपल्या नातवाने मोठे यश मिळविल्याने राष्ट्रवादीचे नेते संपतराव देशमुख, कॉंग्रेस नेते वसंतराव देशमुख अन् विलासराव देशमुख यांनी मेहकरमधील सेंट्रल प्लाझा हॉटेल येथे हरिष देशमुख यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह सर्वच पक्षातील मंडळी, परिसरातील सर्व विभागाचे अधिकारी, अनेक डॉक्टर, नातेवाईक अन् देशमुख परिवाराचे मित्रमंडळही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन अन् आभारही व्यक्त करण्याचा आनंद लेखक विनोद बोरे यांना घेता आला. अन् आपल्या भाच्याचे कौतूक डोळेभरुन पाहता आले. तसे शंकरराव देशमुख हेदेखिल त्यांच्या सोबतीला येणाऱ्या पाहुण्यांकडे लक्ष ठेवून होतेच. मेघाताई देशमुख, हरिष देशमुख यांनी जनस्वप्नपूर्ती कार्यालयात सत्कारही स्विकारला. यावेळी त्यांच्यासोबत होत्या सुप्रियाताई देशमुख. यावेळी जनस्वप्नपूर्तीच्या सरव्यवस्थापिका तथा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सहसंघटक अर्चना बोरे यांनी मायलेकाचे औक्षण केले अन् त्यांच्या दिर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. मेघाताई अन् हरिष देशमुख या मायलेकाचा भावनिक संघर्ष, त्यांचे सुसंस्कार जनस्वप्नपूर्ती परिवाराने जाणून घेतले. अन् त्यांची नम्रता, सोज्वळपणा अन् संघर्ष करण्याची तयारी अनुभवली. यावेळी जनस्वप्नपूर्तीचे संपादक विनोद बोरे यांनी हरिष देशमुख, मेघाताई देशमुख अन् शेलगाव देशमुख येथील देशमुख परिवाराचेही विशेष कौतुक केले. अन् भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post