रुग्णालयातून पळाली गर्भवती...हतबल आरोग्य यंत्रणा सात दिवसांपासून दहेंद्री गावात तळ ठोकून; कुटुंबीयांनी पुन्हा येण्यास नकार देत केली शिवीगाळ...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
पहिली प्रसूती अन् त्यात नवव्या महिन्यांची गर्भवती असलेल्या दहेंद्री येथील विवाहितेचा रक्तदाब वाढल्याने अतिगंभीर असतानाही तिने रुग्णालयात येण्यास नकार दिला. कुटुंबातील सदस्य व ती स्वतः आरोग्य यंत्रणेला शिवीगाळ करत हाकलून लावत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. गुरुवारी तर पोलिस नेऊनही फायदा झाला नाही. अखेर हतबल आरोग्य यंत्रणेने सात दिवसांपासून तिची काळजी घेत मनधरणी करत गावातच तळ ठोकला आहे.कालेय सुधीर शेलूकर (१९, रा. दहेंद्री), असे गर्भवतीचे नाव आहे. तिला नववा महिना सुरू आहे. रक्तदाब चाढल्याने आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली आली आहे. मेळघाटात बालमृत्यू मातामृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. परंतु, आदिवासीसुद्धा सहकार्य करत नसल्याचा प्रकार पुन्हा पुढे आला. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राकेश आलोकार, डॉ. अमित पातोंड, डॉ. स्वाती राठोड, सरपंच संजू साकोम, आरोग्यसेवक अक्षय गायकवाड, ग्रामसेवक नरेंद्र इंगळे, परिचारिका अर्चना नांदूरकर, काळे, समुपदेशक साहेबलाल अखंडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी तिची प्रचंड मनधरणी केली.
उच्च रक्तदाबावर होणार होता उपचार...
१.) कालेय शेलूकरची १ जानेवारी रोजी डॉक्टरांनी तपासणी केली. उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. घरी औषधोपचाराने तो कमी झाला नाही.१ जानेवारी रोजी सोनोग्राफीसाठी चुरणी आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तेथेच दाखल केले; पण तिने पळ काढला. त्यानंतर दहेंद्री गावात आरोग्य यंत्रणा सतत घरी तळ ठोकून आहे. यादरम्यान कुठला त्रासच नसल्याने दवाखान्यात नेणार नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला नकार देत शिवीगाळ करण्यात आली. सात दिवसांपासून अॅम्ब्युलन्ससह आरोग्य यंत्रणा तिच्या होकाराची वाट पाहत आहे.
