ग्राम सक्षम उपक्रमाचा प्रभावी ठसा – 15 गावांतील 300 महिलांना रोजगार, 507 शेळीपिल्लांचा हमखास आधार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
विकास सहयोग प्रतिष्ठान आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामपूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या *SBI ‘ग्राम सक्षम’* उपक्रमाने ग्रामीण महिलांच्या जीवनात आशादायक बदल घडवून आणले आहेत. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील 15 गावांमधील 300 महिलांची निवड करून त्यांना प्रत्येकी दोन अशा 600 शेळ्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच निवारा शेड, फॉडर लागवडीसाठी सहाय्य आणि विमा सुविधा देखील देण्यात आल्या.या उपक्रमामुळे महिलांना स्थानिक स्तरावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून स्थलांतराचे प्रमाणही घटले आहे. या शेळ्यांपासून आतापर्यंत 507 पिल्लांची भर पडली असून महिलांचे दैनंदिन उत्पन्न व आर्थिक स्थैर्य वाढले आहे. विशेषतः धामणगाव सारख्या ग्रामीण भागात ‘शेळी समृद्धी सेंटर’ स्थापन करून शेळ्यांच्या आजारांवर तात्काळ उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना रुजवणारा हा उपक्रम मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा खर्च आणि कर्जमुक्ती या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. गावांतील सरपंच, युवक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.ग्राम सक्षम उपक्रमामुळे केवळ शेळ्यांचे वाटप झाले नाही, तर महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पातळीवर गावांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे.हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा आदर्श ठरत असून इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर राहुल खडसे, प्रोग्राम मॅनेजर संदीप धोटे, लाइवस्टॉक ऑफिसर उमेश राठोड, शोभा हिवरकर तसेच 15 गावांतील पशुसखींचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.