बदनापूरच्या खासगी शाळेवरील लाचखोर लिपिक जाळ्यात..सेवानिवृत्त महिला शिक्षिकेकडून लाच स्वीकारली..
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
सेवानिवृत्त महिला शिक्षिकेला अरियर्स काढून देण्याकरिता चक्क दहा टक्के रकमेची लाच मागणारा खासगी शाळेचा लिपिक लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात सोमवारी सायंकाळी ४ वाजता अडकला. उमेश मनोहर कडू (४८, रा. साईलीला खांजोडेल) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.चिखलदरा तालुक्यातील बदनापूर येथील किसनराव उभाड विद्यालयात परतवाडानजीकच्या देवमाळी येथील उमेश कडू हा लिपिक पदावर कार्यरत आहे. तक्रारदार सेवानिवृत्त महिला शिक्षिका या सन २००३ ते २०२२ या कालावधीत किसनराव उभाड विद्यालयात कार्यरत होत्या. त्या सन २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या पे फिक्सेशनचे एकूण अरियर्स ६९ हजार रुपये शासनाकडे देय होते. प्रलंबित रक्कम काढण्यासाठी विद्यालयामार्फत आवश्यक त्याच्या १०टक्के रकमेची मागणी उमेश कडू हा करत होता. शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी ४ वाजताच्या सुमारास शिक्षिकेकडून सहा हजारांची लाच त्याने घेतली आणि त्या क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष त्याला पकडले. आरोपीविरुद्ध अचलपूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक मंगेश मोहोळ, पोलिस निरीक्षक केतन मांजरे, जमादार राजेश मेटकर, विनोद धुळे, युवराज राठोड, आशिष जांभोळे आदींनी ही कारवाई केली. या घटनेमुळे अचलपूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.