राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसाठी वाढदिवस म्हणजे जल्लोषाची मोठी पर्वणीच असते. बडेजाव आणि थाटमाट काही औरच असतो. मात्र, शेतकरी नेते रविकांत तुपकर त्याला अपवाद ठरले आहेत. वाढदिवशी कुठलाही आनंदोत्सव साजरा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या घराच्या अंगणातच तुपकर यांनी पत्नी, आई, वडील, मुले आणि बहिणींसह १३ मे रोजी जन्मदिनी लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले. जगाच्या पोशिंद्यासाठी केलेला हा एल्गार अधिक तीव्र करण्यासाठी शेतकरीदेखील मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी दाखल झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनही कास्तकार आल्याने या आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. या आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर कुटुंबीयांनी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.वाढदिवस हा आनंदाचा उत्सव म्हणून मनवला जातो, पण रविकांत तुपकर यांनी वाढदिवशी कुठलेही हारतुरे, सत्कार न स्वीकारता आजचा जन्मदिन शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी समर्पित केला. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी जगणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकऱ्यांवर त्यांनी अक्षरश: जीव ओवाळून टाकला आहे. 'जगेल तर शेतकऱ्यांसाठी, मरेल तर शेतकऱ्यांसाठी' या ध्येयाने जगणारे रविकांत तुपकर हे वाढदिवस साजरा न करता विविध मागण्यांसाठी अन्नत्यागाला बसले. वाढदिवशी आंदोलन करणारे रविकांत तुपकर हे राज्यभरातून एकमेव नेते ठरल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. त्यातच दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. बँकांनी होल्ड लावले आहेत, सक्तीने कर्ज वसुली सुरू आहे. अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीतून जातोय, तरुण अस्वस्थ आहेत, देशातील वातावरण अस्थिर आहे अशा पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करण्याचा विचारही मनाला पटत नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी आपण आजचा हा लढा उभारल्याचे रविकांत तुपकर शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
--या मागण्यांकडे वेधले लक्ष--
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, १००% पीकविम्याची रक्कम अदा करावी, सोयाबीन-कापसाला भावफरक द्यावा, बँकांनी खात्यांना लावलेला होल्ड काढावा, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेती पिकांना संरक्षण म्हणून कंपाऊंड लावावे, उसाला एकरकमी, दूध, कांद्याला अनुदान मिळावे , शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज वाटप व पीक कर्ज मर्यादा वाढवावी,शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, रखडलेले अनुदान मिळावे द्यावी, या मागण्यांकडे तुपकरांनी लक्ष वेधले.
--रात्री बारापर्यंत चालले आंदोलन--
जन्मदिनाच्या पर्वावर रविकांत तुपकर यांच्यासह कुटुंबीयांनी आज सकाळी नऊ वाजेपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन रात्री बारा वाजेपर्यंत चालले. शेतकरी संघटने नेते नामदेवराव जाधव व दलितमित्र शेषराव पाटील सावळे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांची प्रतिमा व भारत मातेच्या पूजनाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रगीतही झाले.
--दिवसभर शेतकरी प्रश्नांवर विचारमंथन--
रविकांत तुपकर यांनी उपोषणामागची भूमिका विशद केली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही मान्यवरांनीही पाठिंबा दर्शविला. आपले मनोगत व्यक्त केले. काही शेतकऱ्यांनीही विचार मांडताना रविकांत तुपकर यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तुपकरांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. युवा शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी उसळली होती. शेतकरी प्रश्नांवर दिवसभर विचार मंथन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. पाठिंबा देण्यासाठी दिवसभर रिघ लागली होती.
--शहिदांना आदरांजली, 'जय जवान, जय किसान'चा नारा--
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांसह शहिद जवानांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. शेतकरी आणि सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून 'जय जवान, जय किसान'चे नारे देण्यात आले.
--मंडप भिजला, पण आंदोलन नाही थांबले--
वाढदिवसाच्या निमित्ताने आंदोलनात्मक भूमिका घेणे, ही पहिलीच वेळ असल्याने हे अन्नत्याग आंदोलन लक्षवेधी ठरले. सकाळी पडलेल्या पावसाने मंडप ओला झाला, तरीसुद्धा पावसातच सकाळी ९ वाजेपासून तुपकर कुटुंबीयांनी अन्नत्याग सुरू केले.कुटुंबातील पाठीराखे पत्नी शर्वरी तुपकर, वडील चंद्रदास तुपकर, आई गीताताई तुपकर, बहीण राधा तुपकर, बहीण मीना गवते, मुलगी यज्ञजा, मुलगा देवरत यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांसोबतच कुटुंबातील हे सदस्य तुपकरांची खरी ढाल म्हणून पाठीशी असल्याचे यावेळी दिसून आले.