ठेकेदाराने हातपंप काढून फेकला? गावात 'पाणीटंचाई' बहाद्दरपूरच्या पुलावर वीजचोरीनंतर, पाणी चोरी उघड...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील बहाद्दरपूर येथील पुलाच्या कामात वीजचोरी करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने चक्क हातपंपातील साहित्य फेकून मोटर टाकली आणि पाणी चोरीला सुरुवात केली. गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या पुलाच्या बांधकामासाठी चोरी करून शासनालाच चुना लावल्या जात आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी गप्प बसून आहे. भ्रष्ट वृत्तीने पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.बहादरपूर येथे पाच कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वीजचोरी तर पाणी चोरी हाच प्रकार कामावर सुरू असल्याने चोरीतूनच पुलाचे बांधकाम करीत कंत्राटदार शासनाला चुना लावत आहे. हा सर्व प्रकार संबंधित अभियंता यांना माहित नाही का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अभियंता कामावर येतात किंवा नाही, हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.वीजचोरी होत असताना विद्युत वितरण कंपनी कुंभकर्णी झोपेत, तर हातपंप काढून तोडण्यात आला. त्यात पाण्याची मोटर टाकून पाण्याची चोरी सुरू आहे. बहादरपूर गावात दरवर्षी पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे ठेकेदार पाणी चोरी करीत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
___________________________________
--फौजदारी कारवाई करा---
कोट्यवधी रुपयांच्या कामावर सर्व चोरीने सुरू असल्याचा प्रकार ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व आदिवासींना दिसत असताना प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्याला दिसू नये, हे न उलगडणारे कोडे ठरले आहे. त्यामुळे उघडकीस आलेल्या या संपूर्ण प्रकारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे...
___________________________________
---हातपंपात टाकली इलेक्ट्रिक मोटर--
हातपंप उघडून त्यातील साहित्य काढून फेकण्यात आले. त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर टाकून चोरीच्या विद्युत पुरवठा व पाण्याची चोरी सुरु आहे. गंभीर प्रकारावर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गप्प आहेत.
