भोन येथील स्तूपाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला लवकर सुरुवात करा - डॉ. सिद्धार्थ मेश्राम ...बुद्ध जयंती निमित्य भोन मध्ये लोटला हजारोंचा जनसागर! जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज!


 
भोन येथील स्तूपाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला लवकर सुरुवात करा - डॉ. सिद्धार्थ मेश्राम ...बुद्ध जयंती निमित्य  भोन मध्ये लोटला हजारोंचा जनसागर! जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज! 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात 2300 वर्ष जुन्या सम्राट अशोकांनी बांधलेल्या बुद्ध स्तूप स्थळावर दरवर्षीप्रमाणे  भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून बुद्ध जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यास्तव बुलढाणा जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून हजारोंचा जनसागर या ठिकाणी लोटला होता. दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असणाऱ्या भोन बुद्धस्तूप परिसराला संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा विभागाला संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे आवाहन केले. बुलढाणा जिल्ह्याला जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या भोन येथील बुद्ध स्तूप स्थळावर बुद्ध जयंती निमित्त "महा वंदना" तसेच बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ मेश्राम हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून समितीचे सचिव प्रा. प्रफुल खंडारे, समितीचे कोषाध्यक्ष जी. एन. ब्राह्मणे, सदस्य राजाभाऊ कोकाटे, एड. संतोष तायडे हे होते. समितीचे कोषाध्यक्ष जी. एन. ब्राह्मणे यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासह भोन बुद्ध स्तूप स्थळावर महावंदना केली. दरम्यान आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव प्रा. प्रफुल खंडारे यांनी करत उपस्थिताना 2002 सालापासून डेक्कन कॉलेजने केलेल्या संशोधनात सापडलेल्या स्तूपाबाबत आजपर्यंत घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य राजाभाऊ कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शत्रुघ्न जाधव यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. पुढे डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या 84 हजार स्तूपापैकी हा एक स्तूप भूमिगत  असल्याचे सांगून आगामी काळात बौद्ध संस्कृतीचा वारसा संपूर्ण भारत देशालाच नाही तर जगाला कसा उपयोगी आहे, हे सांगताना जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे, हे अधोरेखित केले. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर लगेचच सांगितकार अमोल पहुरकर यांच्या स्वर झंकार मयुझिकल संचाकडून बुद्ध -भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीने या ठिकाणी  उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक वस्तूंची पोस्टर प्रदर्शनी देखील प्रदर्शित केली होती. वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म, सिद्धार्थाला संबोधी प्राप्ती तसेच भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण एकाच दिवशी झाले असल्याने या वैशाखी पौर्णिमेला बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, यवतमाळ, अमरावती, वाशिम या जिल्ह्यातूनही असंख्य बौद्ध अनुयायी बुद्धाच्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले होते. या ठिकाणी उपोसथ दिनानिमित्त बौद्ध उपासक व उपासिकांना वाघोदे आणि शिरसाट कुटुंबियांकडून खीर दान करण्यात आले तर उसळी चे देखील वाटप करण्यात आले. या संपूर्ण महावंदना, व्याख्यान आणि बुद्ध भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष जी. एन. ब्राह्मणे यांनी केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी सचिव प्रा. प्रफुल खंडारे यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोन येथील समिती सदस्य सुरेश वानखडे आणि त्यांची टीम, शेतकरी श्रीकृष्ण इंगळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तसेच भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान शहीद झालेल्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला.

Previous Post Next Post