आधी बुलढाण्यात गुंडांना घाम फोडला तर सोमठाण्यात डोंगराला फोडला पाझर..!-सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी फुलवली हिरवाई..!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिद वाक्याप्रमाणे खाकी वर्दीला झळाळी देऊन बुलढाणा जिल्ह्यातील अट्टल गुंडाना घाम फोडलेल्या सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांनी आता जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा जगदंबा माळरानाला पाझर फोडला. जिथे कुसळां शिवाय काही दिसत नव्हते त्या ओसाड माळरानावर आज एक दोन नव्हे तर १२०० झाडे लावल्याने हिरवाई नांदताना पहायला मिळत आहे. त्यामुळे गिते यांचे आधी समाज रक्षण आणि आता पर्यावरण संवर्धन दखलपात्र ठरणारे आहे.बुलढाणा येथे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख म्हणून बळीराम गीते यांनी सेवा दिली आहे.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणून अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे. त्यांनंतर बळीराम गिते हे बोराखेडी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बोराखेडी येथेच ते सेवानिवृत्त झाले. समाजसेवेची आवड जपणाऱ्या गितेंनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील जगदंबा डोंगरावरील देवी मंदिर परिसरात विविध प्रजातींच्या तब्बल १२०० वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये पाम ट्री, पिंपळ, वड अशा सावली देणाऱ्या तर काही सौंदर्य फुलविणाऱ्या फुल झाडांचा समावेश आहे.बळीराम गीते यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला होता.परंतु डोंगरावर हिरवाई फुलवण्याची वाट सोपी नव्हती. त्यासाठी गीते यांना मेहनत आणि मातीत उतरून मोलाचे काम करावे लागले.यासाठी त्यांनी सोमठाणा परिसरात स्वखर्चाने बोरवेल खोदले. या माध्यमातून त्यांनी झाडांसाठी टाकी द्वारे पाण्याची सोय उपलब्ध केली. काही काळात डोंगरावर फुललेली हिरवाई त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गीते यांनी झाडांसाठी ठिबक सिंचन सुविधा केलेली आहे.सर्व वृक्षांना संरक्षण जाळ्या बसविल्या आहेत. ऑक्सीजन देणारे व पर्यावरणाचे संतुलन राखणारे बळीराम गीते यांचे हे ग्रीन मिशन प्रशंसनिय असे आहे.
--वृक्ष संवर्धनाचा मानस--
जगदंबा देवीच्या डोंगरावर पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येतात.सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे या ठिकाणी काही सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने १२०० झाडे लावली आहेत.भविष्यात डोंगरावर आणखी वृक्ष संवर्धन करण्याचा माझा मानस आहे.
-बळीराम गीते, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक