स्व.भावेश सोलंकी व स्व.कबीरच्या स्मरणार्थ डोळे तपासणी व रक्तदान शिबीर.एमरा व संजय विरवाणी यांच्यावतीने आयोजन.
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....
अकोट येथे आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन म्हणजे एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांचे वतीने त्यांचे दिवंगत सुपुत्र कबीर विरवाणी यांच्या द्वितिय स्मृतीप्रित्यर्थ दिनांक २७ जुन गुरूवारला दुपारी ४ वाजता शहरातील झुनझुनवाला अतिथीगृहात भव्य डोळे तपासणी शिबिर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्व.कबीर विरवाणी याचे वयाच्या नवव्या वर्षीच असाध्य आजाराने निधन झाले होते. कबीरचे मरणोत्तर नेत्रदान करुन वडिल संजय विरवाणी यांनी सामाजिक दायित्व निभावले होते.अतिशय दुःखात असतांना देखील घेतलेल्या या धाडसी निर्णयासाठी विरवाणी कुटूंबाचे अकोट शहर वासियांनी कौतूक केले होते.एमरातर्फे राष्ट्रीय सचिव स्व.भावेशभाई सोलंकी यांच्या स्मृतीनिमित्त संपूर्ण भारतात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.स्व.सोलंकी व स्व.कबीर या दोघांच्याही स्मरणार्थ डोळे तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन संजय विरवाणी यांनी केले असून डोळे तपासणी व रक्तदान शिबीराला प्रतिसाद द्यावा असे आवाहन विरवाणी यांनी केले आहे. सदर शिबिरात डोळे तपासणी करिता अकोला येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.भावेश गुरुदासानी सेवा देणार असून पुढील उपचारां बाबत मार्गदर्शन करणार आहेत तसेच रक्त संकलनसाठी अकोला येथील साई रक्तपेढी सेवा देणार आहेत. त्यामुळे गंभीर आजार नसलेल्या रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करुन पुण्यकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी एमराचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच संजय विरवाणी व मित्र परिवार अहर्निश प्रयत्नरत आहेत.