शेतकरी बंधुनी आधुनिक शेतीकड़े वळन्याची गरज - आ डॉ संजय कुटे... शेतकऱ्यांसाठी खजूर शेती चा उत्तम पर्याय...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद येथे खजूर पिकाबाबत माहिती व्हावी याकरिता खजूर उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत खजूर लागवड करण्यात उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पारंपरिक पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागणारे, कमी देखभाल लागणारे, आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक म्हणून खजूर शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आपल्या जळगाव जामोद मतदारसंघातील काही भागामध्ये जमीन ही खजूर लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.कार्यशाळेमध्ये अप्पासाहेब शेंडगे, प्रकल्प विशेषज्ञ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जालना यांनी खजूर लागवडीबाबत सखोल माहिती दिली. विदर्भातील उष्ण व कोरडे हवामान खजूर लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे. योग्य जातींची निवड, ठिबक सिंचनाचा वापर, जैविक खते आणि कीड नियंत्रणाची योग्य पद्धत वापरल्यास अल्प गुंतवणुकीतून दीर्घकाळ उत्पन्न मिळवता येऊ शकते. श्री. जगदीश शेंडगे, प्रगतशील शेतकरी तणवाडी, जि. जालना यांनी जालना जिल्ह्यातील यशस्वी खजूर शेतीचा अनुभव शेअर केला. त्यांनी प्रतिवर्षी प्रती झाड शेकडो किलो उत्पादन मिळते, असे नमूद करत शेतकऱ्यांनी या पिकाला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले.रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद, आणि श्रीकृष्ण शिंदे उपकृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी खजूर लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, अनुदान, आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. फळबाग लागवड योजना, पीएमएफएमई योजना आणि प्रक्रिया उद्योगासाठीच्या स्टार्टअप योजना शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा देऊ शकतात. याशिवाय कृषी विभागामार्फत खजूर लागवडीसाठी दर्जेदार रोपे, तांत्रिक सहाय्य आणि प्रात्यक्षिके उपलब्ध करून दिली जात आहेत.या कार्यशाळेमध्ये खजूर प्रक्रिया उद्योग, निर्यात संधी, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचे विविध पैलू यावरही विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. खजूरपासून साखर, सिरप, बर्फी आणि आरोग्यदायी स्नॅक्स तयार करता येतात. या सर्व प्रक्रियेच्या टप्प्यांवर आधारित लघुउद्योग ग्रामीण भागात उभारता येतील आणि त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊ शकेल. विशेष म्हणजे, खजूर पिकाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर झाडे ३० वर्षांपर्यंत फलधारणा करत असल्यामुळे एकदा लागवड केल्यावर शेतकऱ्यांना दीर्घकाळ उत्पन्न मिळण्याची खात्री असते.या उपक्रमामुळे जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना नव्या शेती पर्यायाबद्दल मार्गदर्शन झाले असून, भविष्यात खजूर लागवडीच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढवणे, फळप्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारणे शक्य होईल. कार्यशाळेअंती शेतकऱ्यांनी खजूर लागवड सुरू करण्यास उत्सुकता दर्शवली असून, लवकरच प्रत्यक्ष लागवड क्षेत्र पाहणी, प्रशिक्षण शिबिरे आणि खजूर रोपे उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना शेतीतील बदल स्वीकारण्यासाठी नवी दिशा मिळाली असून, खजूर लागवडीच्या माध्यमातून समृद्धीचे नवीन दार खुले होईल, असा विश्वास व्यक्त केला.
