सोनाळा येथे ग्रामपंचायत कर्मचारी महिलांचे कामानुसार मजुरीसाठी आमरण उपोषण....
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
सोनाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील साफसफाई करणाऱ्या दोन कर्मचारी महिलांनी कामानुसार योग्य मजुरीच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या दोन लाडक्या बहिणींनी आपल्या हक्कासाठी अन्नाचा त्याग केला असून, त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. मात्र, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने अद्याप याची कोणतीही दखल घेतलेली नाही.या उपोषण मंडपाला स्वराज्य पक्षाचे नेते पवन शेंडे आणि प्रतीक गावंडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या महिलांची संपूर्ण हकिकत ऐकून घेतली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ दखल घेऊन या महिलांना न्याय देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय गाठण्याचा इशारा पवन शेंडे आणि प्रतीक गावंडे यांनी दिला आहे.महिलांच्या या लढ्याला गावकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलून या कर्मचारी महिलांना त्यांच्या कामाचे योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
