औद्योगिक विकासाबाबत पश्चिम विदर्भाचा विचार करण्याची आवश्यकता- डॉ. कुटे...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
देशातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून राज्यात प्रचंड गुंतवणूक होत असल्याने देशाच्या विकासात राज्यात सिंहाचा वाटा आहे. असे असताना मात्र राज्यातील काही जिल्ह्यांपुरताच औद्योगिक विकास मर्यादित आहे. राज्याच्या समग्र औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीचा असमतोल होता कामा नये. त्यामुळे औद्योगिक विकासबाबतफक्त मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यासारख्या जिल्ह्यांचाच विचार न करता धोरणात बदल करून उद्योगधंदे वाढण्यासाठी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी आमदार डॉ संजय श्रीराम कुटे यांनी विधानसभेत केली.विधानसभेत 15 जुलै रोजी 293 च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी वरील मागणी केली.डॉ संजय श्रीराम कुटे यांनेी सरकारच्या कारभाराचे कौतुक केले. मात्र, औद्योगिक विकासबाबत पश्चिम विदर्भाचे मागासलेपणसुध्दा सरकारच्या निदर्शनास आणून दिले.विदर्भातील मुलांनी किती दिवस मुंबई-पुण्यात जाऊन नोकरी कराबी लागणार, असा त्यांनी सवाल केला. महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीत पश्चिम विदर्भाचाही वाटा महत्त्वाचा राहिला पाहिजे. त्यासाठी तिथे मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अकोला जिल्हा हा देशाच्या केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी मोठा उद्योग उभा राहिल्यास तेथे निर्माण झालेली उत्पादने देशभरात पोहचवणे स्वस्त पडणार आहेत. असेही आमदार कुटे म्हणाले. देशामध्ये उद्योजक आणि शेतकरी हे दोन घटक मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतात. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्र राज्याला औद्योगिकदृष्ट्या पुढे न्यायचे असेल तर धोरणात बदल करण्याची आवश्यकता आ. कुटे यांनी अधोरेखित केली. कोटयावधीची गुंतवणूक असलेला मोठा उद्योग अकोला येथे तयार झाल्यास अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बेरोजगारांना मोठा फायदा होईल.असे मत आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केले.