मग्रारोहयोमध्ये दलालांचा धुमाकूळ.डाटा ऑपरेटर आणि ए.पी.ओ.च्या संगनमताने चालतोय मस्टरचा खेळ..लाखोंचा निधी अपहाराच्या मार्गावर...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील 'मग्रारोहयो' महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्याप्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस येत असून, या विभागात दलाल सक्रिय झाले आहेत. रोजगार सेवक, डाटा ऑपरेटर व सहायक कार्यक्रम अधिकारी (ए. पी.ओ.) यांच्या संगनमताने परस्पर मस्टर जनरेट करून लाखो रुपयांचा निधी उचलण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.तालुक्यातील चिखली व भेरोजा गावासाठी मंजूर कामांच्या संदर्भात २०२४-२५ या आर्थिक वर्षात मस्टर नंबर ४४७१२, ४४७१३, ४४७१४ आणि ४६०३९,४६०४० हे मस्टर परस्पर तयार करण्यात आले आहेत.सदर मस्टर नोंदवून १ लाख ४ हजार ६१५ रू. इतक्या मजुरीचे काम दाखवण्यात आले; मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच बिसराम बाबू दारसिम्बे यांच्याकडे मंजूर असलेल्या कामांमध्येदेखील मोठा घोटाळा उघड झाला आहे.मस्टर नंबर ३६२०९,३६२१०,३६२११,४४७१७, ४४७१८, ४४७१९ वर काम झाल्याचा बनाव करून ९६,०७५ रूपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे. हे सर्व मास्टर कोणतीही परवानगी न घेता रोजगार सेवकाने डाटा ऑपरेटरच्या मदतीने जनरेट केल्याचे पत्रातून स्पष्ट झाले आहे.तांत्रिक अधिकारी (PTO) यांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला असून, अक्षय प्रकाश मोहोड या तांत्रिक सहायकाने गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र देत तपासणी व कारवाईची मागणी केली आहे. मग्रारोहयोच्या अनेक कामांमध्ये स्थानिक दलालांचा हस्तक्षेप वाढलेला असून, ते रोजगार सेवक, डाटा ऑपरेटर व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त कागदोपत्रीच कामे दाखवत आहेत. यातून निधी अपहार होत असून, गरजू मजुरांचे हक्काचे रोजगाराचे दिवस हडपले जात आहेत.