पोरगव्हाण ते धामणगाव रस्त्यावरील पूल देत आहे अपघाताला निमंत्रण...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती मोर्शी तालुक्यातील धामणगाव ते पोरगव्हाण रस्त्यावरील पूल गेल्या काही दिवसापासून खचल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हा पुल सध्या स्थितीत अपघाताला निमंत्रण देत आहे. याच पुलावरून मागील वर्षी विष्णोरा येथील हरिदास लोखंडे ही व्यक्ती, खचलेल्या पुलामुळे दुचाकी सहित वाहून गेला होता. सुदैवाने तो वाचला, परंतु अजूनही प्रशासनाला अजूनही जाग आली नसून,मोठा अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. याच रस्त्यावरून दररोज अमरावती ते विष्णोरा बस येते. मात्र वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात त्या पुलावरून पाणी वाहत असते ,जर एखाद्या वेळेस वाहन चालकाला त्याचा अंदाज आला नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्या करिता मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आणखी एखादा पाऊस आला तर दोन्ही गावचा संपर्क तुटण्याचे चित्र या पुलामुळे दिसत आहेत. याचा फटका आजूबाजूच्या गावाला देखील बसत आहे. पूल अर्धा खचल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून प्रशासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.