श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती संत गाडगेबाबा व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन केले. या कार्यक्रमात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे चरित्र व विचार यांचे सविस्तर दर्शन विद्यार्थ्यांसमोर घडविण्यात आले.या कार्यक्रमाचे पाहुणे जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंद जोशी होते. त्यांनी आपल्या मनोगतात “समर्थ राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची आहे” या दृष्टीने दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांची मांडणी केली. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना समाजकार्य व राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पंडित उपाध्यायांचे एकात्म मानव दर्शन हे तत्त्वज्ञान आजच्या समाजासाठीही तितकेच मार्गदर्शक असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कुलकर्णी यांनी केले. एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सायखेडे, प्रा. सचिन उन्नतकाट प्रा. उमरकर व प्रा. सिद्धार्थ इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.