चालकानेच रचला मालकाला लुटण्याचा कट: डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची पिशवी हिसकावली...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
पोट दुखत असल्याचे खोटे कारण सांगत व्यापारी मालकालाच गाडी चालवायला लावली. नंतर, रस्त्याच्या कडेला गाडी उभी करण्याचे सांगत आपल्या साथीदारांसह मालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली व चाकूचा धाक दाखवून पाच किलो वजन असलेली सोन्याची पिशवी लंपास केली. हा खळबळजनक घटनाक्रम 22 ऑगस्टच्या सायंकाळी समृद्धी महामार्गावर घडला.खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी मेहकर येथून समृद्धी महामार्गाने एमएच 43 बीयू 9557 क्रमांकाची कीया गाडी निघाली होती. गाडीमध्ये सोन्याचे व्यापारी असलेले अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) आपल्या चालकासह प्रवास करीत होते. ‘मालक, माझे पोट दुखत आहे, तेव्हा गाडी तुम्ही चालवा’ असे सांगितल्याने स्वतः अनिल चौधरी यांनी गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले होते. पुढे, ‘पोट खराब झाल्याचे सांगून चालकाने मालकाला गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी उभी केल्यावर पाठीमागून आलेल्या इनोव्हा चारचाकीमध्ये चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी जवळ येवून त्यांच्या हातावर चाकू मारला. इतक्यात मिरचीची पूड डोळ्यांमध्ये फेकली. याच दरम्यान अनिल चौधरी यांच्या चालकाने त्यांच्या जवळ असलेली पिशवी ज्यामध्ये जवळपास पावणे पाच किलो सोने होते, ती हिसकावली. यानंतर, तो दरोडेखोरांच्या गाडीमध्ये बसला आणि गाडी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळविली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दरडोखोरांची गाडी मालेगाव येथील टोलनाका पास करून पातुरच्या दिशेने गेली होती. त्याठिकाणी देखील पातुर पोलीस व अकोला पोलिसांनी नाकाबंदी केली असता पातुरच्या जंगलामध्ये दरोडेखोर गाडी रस्त्याच्या कडेला सोडून पसार झाल्याचे समजले.