श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन उत्साहात साजरा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जागतिक पातळीवर भाषा, साहित्य व संस्कृती यांचे पूल बांधणारे महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषांतर दिनाचे औचित्य साधून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. निळकंठ राठोड, मराठी विभाग प्रमुख प्रा. गवई, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात...
सर्वप्रथम माता सरस्वती व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर इंग्रजी विभागातील प्रा. प्रदीप चव्हाण यांनी प्रस्तावना मांडून भाषांतर दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की भाषांतर ही मानवतेला जोडणारी एक महत्त्वाची कडी आहे. विविध भाषांतील ज्ञान उपलब्ध करून देण्याचे माध्यम भाषांतर होय.
या कार्यक्रमात इंग्रजी व मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मराठी अभ्यास मंडळात अध्यक्ष वृषाली कुलकर्णी, उपाध्यक्ष प्राची भालतडक,सचिव प्रतीक्षा कुणगाडे, सहसचिव स्नेहल भोपळे, कोषाध्यक्ष मयुरी बंड,प्रसिद्ध प्रमुख ज्ञानेश्वरी सोनोने, सदस्य दिव्या खराटे अश्विनी इंगळे सह अन्य इंग्रजी अभ्यास मंडळात अध्यक्ष ऋतुजा चौधरी, उपाध्यक्ष वैष्णवी खेडकर, सचिव नेहा वानखडे, श्रुती मानकर, सहसचिव करण जाधव, कोषाध्यक्ष प्रतीक्षा कून गाडे, प्रसिद्धी प्रमुख निकिता जाधव, सदस्य पल्लवी माकोडे सह अन्य नवनियुक्त कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या कार्यकारिणीचे स्वागत केले.
मराठी विभाग प्रमुख प्रा. गवई यांनी आपल्या भाषणात भाषांतराच्या माध्यमातून मातृभाषा व परभाषा यांचा परस्पर संवाद कसा साधला जातो यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की “आज मराठी भाषेत जागतिक साहित्य भाषांतरित झाले आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रचंड खजिना मिळाला आहे. यामुळे मातृभाषेचा विकास होतो.”
प्रमुख पाहुणे प्रा. निळकंठ राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विदेशी भाषांचे अध्ययन, आधुनिक तंत्रज्ञानातील अनुवाद साधने, आणि रोजगाराच्या संधी यांचा वेध घेतला. त्यांनी म्हटले की “भाषांतर कौशल्य आत्मसात केल्यास संशोधन, पत्रकारिता, प्रकाशन, राजनयिक सेवा, आंतरराष्ट्रीय व्यवसाय या क्षेत्रांत करिअरची दारे खुली होतात.” तसेच त्यांनी आपल्या भाषणात जागतिकीकरणाच्या काळात भाषांतराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिणामांवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मायी यांनी भाषांतराचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले –
“भाषांतर ही फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही, तर ती एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीशी जोडणारी सजीव प्रक्रिया आहे. आजच्या विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, साहित्य, इतिहास, तत्वज्ञान या सर्व क्षेत्रांत भाषांतरामुळे जागतिक ज्ञानाचे लोकशाहीकरण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपली मातृभाषा जोपासत इतर भाषाही शिकाव्यात. भाषांतर हे शिक्षणाचे तसेच रोजगाराचे प्रभावी साधन आहे. या कौशल्यामुळे जागतिक स्तरावर विद्यार्थी अधिक सक्षम व स्पर्धात्मक ठरू शकतात.”
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सिद्धार्थ इंगळे यांनी तरल शैलीत केले. प्रा. सायखेडे यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थीवर्ग व अभ्यास मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती आदर, भाषांतराची जाण आणि जागतिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत झाली.