अकोट येथे ईद मीलादुन-नबी निमित्त भव्य व ऐतिहासिक जलूस, शांततेत पार पडला...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....
दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी अकोट शहरात जुलूस कमेटी अकोटच्या मार्गदर्शनाखाली ईद मीलादुन-नबी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. डी.जे., ढोल-ताशांच्या गजरात व "या नबी सलाम आलेका" अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.हा जलूस शौकत अली चौक येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांनी फिरत परत शौकत अली चौक येथे सरपंरस्त श्री आमिर रजा यांच्या परवानगीने समाप्त झाला. संपूर्ण शोभायात्रा शांतता, सौहार्द व बंधुत्वाच्या वातावरणात पार पडली. यात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.जलूसात विविध मशिदी, मदरसे व सामाजिक संघटनांचे मानकरी सहभागी झाले होते. आकर्षक सजावट केलेले ताबूत, झेंडे व धार्मिक फलकांनी सजविलेली वाहने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील प्रमुख चौक-चौकांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. नागरिकांनी फुलांची उधळण करून शोभायात्रेचे स्वागत केले. विविध धर्मीय नागरिकांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन बंधुभावाचा संदेश दिला.जुलूस कमेटीच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, अकोट शहर पोलिस निरीक्षक अमोल माळवे व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांचा सत्कार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जलूसाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. पोलीस प्रशासनाच्या योग्य बंदोबस्तामुळे संपूर्ण मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडली.जलूस यशस्वी करण्यासाठी सरपंरस्त आमिर रजा, अध्यक्ष तोहीद कादरी, फजल सिद्दीकी, मोहम्मद हुसैन, सय्यद मझहर अली, गफूर शाह, वसीम साहेब, खालिद, रझीक साहेब, वहीद रिजवी व अशफाक अली यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.यावेळी टी.आर. ग्रुप तसेच विविध समाजसेवकांनी फळे, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करून नागरिकांची सेवा केली.दरूद-सलामच्या स्वरांनी या ऐतिहासिक जलूसाची सांगता झाली.