राजु भास्करे/अमरावती....
परतवाडा शहरातील गाडीचा काच फोडून बॅग व रोख रक्कम चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश परतवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल अकरा लाख एक्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापारी कैलाश बाथे यांच्या गाडीचा काच फोडून बॅग चोरी झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून परतवाडा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी —
1. विशाल सिंह उर्फ प्रवीण कुमार (वय ४०, रा. शहीद नगर, मेरठ, उत्तर प्रदेश)
2. बृजेश्वर उर्फ अशोक कश्यप (वय ३८, रा. राजनगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश)हे दोघे आरोपी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गाडीचा काच फोडून चोरीचे गुन्हे करीत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ₹९१,९०० रोख रक्कम, मोबाईल, सिमकार्ड तसेच चोरीसाठी वापरलेली चारचाकी कार (किंमत ₹९ लाख) असा एकूण ₹११,९१,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५८२/२०२४ भादंवि कलम ३०२(२), ३७९(१) तसेच महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम २०२४ चे कलम ३(२)(१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, सहाय्यक पोलीस अधीक्षक अमरावती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुरेश रामचंद्र म्हस्के (पोलीस स्टेशन परतवाडा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल विनायक माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल रामकृष्ण गायकवाड, हवालदार कॉन्स्टेबल नितीन होले, हवालदार कॉन्स्टेबल रोशन डोंगरे, हवालदार कॉन्स्टेबल रवींद्र हिंगे, पोलीस नाईक राहुल कडुकर, पोलीस नाईक विजय झाडे, पोलीस नाईक वेंकटेश इंगळे आदी तपास पथकातील अधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.परतवाडा पोलिसांच्या अचूक तपासामुळे या आंतरराज्य चोरट्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, गुन्हेगारीवर पोलिसांनी आणखी एक यशस्वी मोहीम राबवली आहे.