जळगाव जामोद प्रतिनिधी...
बुलढाणा वनविभागाच्या जळगाव (जा.) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अनुसूची – ‘जे’ वनहक्क दस्तऐवजचे वितरण माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी पात्र लाभार्थ्यांना आमदार डॉ. कुटे यांच्या हस्ते वनहक्काचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची नवी भावना निर्माण करणारा असा हा उपक्रम ठरला.आपल्या भाषणात डॉ. संजय कुटे म्हणालेकी,“वनहक्क कायद्याच्या माध्यमातून आदिवासी व वनपरिसरातील नागरिकांना त्यांच्या परंपरागत भूमीवर कायदेशीर हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. या दस्तऐवजांच्या वितरणामुळे नागरिकांना केवळ जमिनीचा हक्कच नव्हे, तर त्यांच्या शेती, उपजीविका आणि सामाजिक स्थैर्याचा आधार मिळत आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.एन. एन. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी वनहक्क कायद्याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली व वनविभागाच्या प्रयत्नांची माहिती दिली.याप्रसंगी वनपाल पि. एन. जाधव, भिंगारा ग्रामचे सरपंच राजेश आवासे, भाजपा तालुकाध्यक्ष (संग्रामपूर), भाऊराव पाटील तसेच वनकर्मचारी एस. आर. सुरत्ने, डी. एस. कडवकर, पी. ए. हागोने, व्ही. ए. धोपे, कु. व्ही. एस. जावळे, गजानन कुटे आदी उपस्थित होते.संचालन व्ही. पी. गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. वाय. जी. गावंडे यांनी मानले.वनहक्क दस्तऐवज प्राप्त करताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले. हा उपक्रम शासनाच्या “सशक्त नागरिक, स्वावलंबी ग्राम” या संकल्पनेला बळकट करणारा ठरला.