आस्की किड्सचा दिवाळी उपक्रम घडवणार उद्याचे उद्यमशील तरुण...


 आस्की किड्सचा दिवाळी उपक्रम घडवणार उद्याचे उद्यमशील तरुण...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....

शहरातील अग्रणी शाळा म्हणून ओळखली जाणारी "आस्की किड्स" आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी नेहमीच आपले वेगळेपण वेळोवेळी अधोरेखित करताना दिसते. भविष्यातील AI टेक्नॉलॉजी व त्यामुळे नोकऱ्यांचा उतरता आलेख लक्षात घेता उद्याचा काळ हा नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांना निराशेच्या गर्तेत ढकलणारा सिद्ध होऊ शकतो.  नेमकी हीच बाब लक्षात घेता ज्ञान व कौशल्य या दोन्हीची सांगड घालणारे "क्षमताधिष्ठीत शिक्षण" आज काळाची गरज आहे. आजचा विद्यार्थी हा अधिक व्यापक अध्ययन करण्यास सक्षम असून त्याची कौशल्य संपादनाची भूक शमविणे शिक्षकांसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी वर्ग अध्यापनासोबतच वर्गाबाहेरील जगाशी विद्यार्थांची हितगुज अधिक फायदेशीर ठरणार आहे.

विद्यार्थ्यांचा बाह्य जगताशी संपर्क यावा व घर, शाळा व आभासी जग या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला समाजाच्या वाणिज्य विषयक गरजा व पैशाचे मूल्य ओळखण्याची कला अवगत व्हावी यासाठी "छोटा उद्यमी" या कृतीउपक्रमाचे आयोजन शाळा प्रशासनाने केले आहे. या उपक्रमासाठी वर्ग १ ली ते १२ वी च्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळा प्रशासन विविध वस्तू, बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन उपलब्ध करून देणार आहे. आपल्या व्यावसायिक गुणांना वाव देत विद्यार्थी सार्वजनिक ठिकाणी इतर व्यावसायिकांच्या स्पर्धेत उतरून या वस्तूंची विक्री करणार आहेत. या व्यवहारातून हाताला लागणारा नफा विद्यार्थ्यांचे व्यवहार चातुर्य व सामाजिक संप्रेषणाची पावती असणार आहे. सदर उपक्रमासाठी लागणारे भांडवल शाळा प्रशासनाने उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने कृतीप्रधान अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुख्याध्यापक नेहा झाडे यांच्या मार्गदर्शनात, प्रकल्प प्रमुख अरुणा काळे, सहप्रकल्प प्रमुख मयुरी गोळे व सर्व सहकारी शिक्षक या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत. शहर वासियांनी विद्यार्थ्यांकडून या वस्तू खरेदी करून उद्याच्या उद्यमशील तरुणांना प्रोत्साहित करण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष मिलिंदजी झाडे यांनी केले आहे.

Previous Post Next Post