नव्या पिढीला पारंपारिक भुलाबाईच्या उत्सवाची पडतेय भुल..ग्रामीण भागात ह्या उत्सवाची परंपरा आजही कायम...


 नव्या पिढीला पारंपारिक भुलाबाईच्या उत्सवाची पडतेय भुल..ग्रामीण भागात ह्या उत्सवाची परंपरा आजही कायम...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

चांदण्यातलं - घराचं अंगण, ज्वारीच्या ओल्या धांड्यांनी तिथे उभारलेला मांडव... त्या मांडवात भुलोबा-भुलाबाईंची स्थापना केल्यानंतर त्यांना पाना-फुलांनी सजविण्याची घरातील लेकी बाळींची धडपड... ती गडबड आटोपल्यानंतर भुलाबाईच्या भोवती फेर धरून नाचण्यातील गंमत आणि त्यानंतर उमटणारे सुरेल स्वर... पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे,द्या तिला मंडोबा खेळी खेळी खंडोबा

दसरा आटोपल्यानंतर खेड्यापाड्यात भुलाबाईच्या माहेरपणाचा उत्सव रंगताे... खेड्यापाड्यात यासाठी म्हटलंय की, मोठ्या शहरात हा उत्सव आता जवळपास इतिहासजमा झालाय... 

आज तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना याबाबत फारच थोडी माहिती आहे... पस्तीशी चाळीशीत असणाऱ्या त्यांच्या आयांची पिढी मात्र भुलाबाईंच्या आठवणीने अजूनही कातर होते...१५-२० वर्षांपूर्वी भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विनातील पौर्णिमेपर्यंत महिनाभर भुलाईचं माहेरपण साजर केलं जायचं... रोज सायंकाळी महिला-मुली खेळ - गाण्यांचा जल्लोष करायच्या... पुढे बाया - मुली जसजशा 'बिझी' व्हायला लागल्यात, या उत्सवाला ययकात्री लागून तो पाच दिवसांवर आला...आज व्यस्ततेमुळे पूर्वीच्या उत्साहात भुलाबाईचं माहेरपण साजरं होत नसलं तरी त्या काळातील आठवणींनी महिला अजूनही मोहरून जातात...पूर्वी भुलाबाईच्या आगमनाचे वेध लागले की, घरोघरी अनोखा उत्साह संचारत असे... भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंकर...

या दोघांच्या मातीच्या प्रतिमा गावातील कुंभाराकडून विकत आणल्या जात.. ज्वारीच्या खोपडीत मखरातल्या पाटावर त्या मूर्तीची स्थापना केली जात असे. त्यापूर्वी त्या पाटावर गहू तांदळाचं आसन तयार केलं जात असे. शेजारी पानाफुलांनी माखलेला नारळ तांब्यावर ठेवला जाई. नारळाच्या भोवती पाच पाने खोवले जायची...या कळसाच्या शेजारी दोन पानं ठेवून त्यावर सुपारी असायची. या कळसाची व सुपारीची पहिली पूजा, त्यानंतर भुलाबाईची. पूजेच्या वेळी भुलोबा भुलाबाईला पिवळी फडकी नेसवायची. हा कुळाचार असायचा. पूजा आटोपल्यानंतर गाण्यांचा फेर सुरू व्हायचा. 'पहिली गं भुलाबाई देवा देवा साजे हे नमन झाल्यानंतर आठवतील तेवढी गाणी म्हटली जायची.आणि शेवटी खिरापतीचं वाटप व्हायचं. दूध, हलवा, गूळ, फुटाणे, पुऱ्या, करंजी असं घरात जे काय असेल त्याची खिरापत केली जायची. 'खिरापत ओळखा' हा प्रकार मनोरंजक असायचा...जुन्या काळात आजसारखी करमनुकीची साधन म्हणून सण साजरे व्हायचे. नवी पिढी या खेळांना कालबाह्य म्हणत असली तरी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्याचे काम हे सण करायचे.नव्या पिढीला या उत्सवाचा जरी विसर पडत असला. तरी, मात्र अजूनही काही ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाताे.काल दि ६ आक्टोंबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी   भुलाबाई उत्सव मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला...

Previous Post Next Post