प्रशांत भोपळे/हिवरखेड...
सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड येथे भारत सरकार शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या महत्वाच्या परीक्षेच्या तयारीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेस महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अनिलकुमार भोपळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी शासनाच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजकुमार अवसरे, अमरावती विभागीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर हे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत यांनी कार्यशाळेचा उद्देश प्रतिपादन केला. प्रारंभी अमरावती विभागीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर यांनी विद्यार्थ्यांना एनएमएमएस परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली व तयारीबाबत मार्गदर्शन केले. पुढे डॉ. अवसरे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना प्रेरणादायी विचार दिले. त्यांनी सांगितले की, “कोणत्याही परीक्षेचा अभ्यास हा भविष्यातील करिअर घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.”कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेल्हारा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विलास घुंगड यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक रंजीत राठोड यांनी केले.या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत भोपळे यांच्या नेतृत्वात शिक्षक अमोल येऊल,शशिकांत दही, रेणुका सोळंके, प्रतिभा इंगळे व शारदा घायल यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.