जळगाव जामोद (प्रतिनिधी) –
जळगाव जामोद नगरपरिषद निवडणुकीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले असून.यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने, राजकीय समीकरणे बदलणार आहेत.जळगांव जामोद मतदारसंघात भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे हे सलग पाचव्यांदा विजयी झाले असून, केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजपची ताकद लक्षात घेता नगरपरिषदेतही भगव्या पक्षाची मजबूत छाप दिसून येत आहे.नगराध्यक्ष पद राखीव असल्याने पक्षाच्या अंतर्गत नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर भाजपात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत गटबाजी टाळून सर्वसमावेशक निर्णय घेणे ही पक्ष नेतृत्वापुढील मोठी कसोटी ठरणार आहे.सेना (शिंदे गट), काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांकडून उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या पक्षांनी ठोस चेहरा जाहीर केलेला नाही. विरोधकांची एकत्रित रणनीती न झाल्यास भाजपचा विजयमार्ग सुकर होऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि रोजगारनिर्मिती हेच निवडणुकीचे प्रमुख मुद्दे असतील. आमदार डॉ. कुटे यांच्या विकासकामांना जनतेचा प्रतिसाद मिळाला असला, तरी नव्या पिढीतील मतदारांना पारदर्शकता, युवा नेतृत्व आणि स्थायी विकासाची हमी हवी आहे. त्यामुळे ‘नवीन चेहऱ्यांना संधी’ हा मुद्दा मतदारांच्या मनात मोठ्या प्रमाणावर आहे.जळगाव जामोद नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे वर्चस्व निर्विवाद असले तरी, आरक्षणाचा घटक आणि युवा उमेदवारांची आकांक्षा यामुळे या वेळी लढत अधिक रंगतदार होणार आहे. पक्षनिष्ठा, व्यक्तिमत्व आणि स्थानिक पातळीवरील संपर्क हेच विजयाचे खरे सूत्र ठरणार आहे.
