जळगाव जामोद प्रतिनिधी–
आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवारांच्या घोषणेला विलंब झाल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांमध्येही ‘नेमका आमचा उमेदवार कोण?’ या प्रश्नावर उत्सुकतेची भावना वाढत चालली आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) तसेच इतर स्थानिक आघाड्यांमध्ये मागील काही दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा, बैठका आणि अंतर्गत राजकारणाचे सत्र सुरू आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत पॅनल किंवा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
दरम्यान, भाजपाकडे सर्वाधिक इच्छुकांची गर्दी असल्याचे समजते. विद्यमान नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरे पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे भाजपमधील अंतर्गत स्पर्धा चांगलीच रंगली आहे. दुसरीकडे, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांतही उमेदवार निश्चितीवर अजूनही चर्चा सुरू असून तिथेही असंतोष आणि समन्वयाचे प्रयत्न सुरू आहेत.शहरातील मतदारांमध्ये उमेदवारांची घोषणा कधी होणार, कोण कोण मैदानात उतरणार याबद्दल उत्सुकता वाढत चालली आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पक्षांच्या रणनीती गुप्तपणे आखल्या जात असल्याचे दिसून येत आहे.राजकीय वर्तुळात मात्र हे स्पष्ट होत आहे की, यावेळी निवडणूक चुरशीची होणार असून इच्छुकांची संख्या पाहता प्रत्येक पक्षाला तिकीट वाटप करताना मोठे गणित सोडवावे लागणार आहे.
