जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठापनाला...


 जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठापनाला...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

गत काही वर्षापासून जळगाव जामोद नगरपरिषदेवर भाजपची सत्ता असून ती सत्ता भाजपच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने मोठा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. नगरपरिषद निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) नेते रंगराव देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय धुळे व शहरप्रमुख संजय भुजबळ,काँग्रेसच्या स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रसेंनजित पाटील, शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख गजानन वाघ, शहरप्रमुख रमेश ताडे यांची प्रतिष्ठान पणाला लागणार आहे. या नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ तसेच शहर प्रमुख रमेश ताडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर मनसेनेही नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित महाविकास आघाडी सोबत युती करण्यास तयार असून वंचित ला सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास वंचित महाविकास आघाडी सोबत राहील. समाजवादी पार्टीने सुद्धा नगरपरिषद निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली असून ते १२ जागी आपली उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

--यावेळची नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची--

यावेळी जळगाव जामोद शहरामध्ये नवीन प्रभाग वाढला असून नगरपरिषदेमध्ये नगरसेवकांची संख्या १८ वरून थेट २१ पर्यंत गेली आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने योग्य उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवाराची अंतर्गत चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे जळगाव शहरात राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. एकूण १० प्रभागांमधून या निवडणुका होणार आहेत..

--नगराध्यक्ष पद नगरपरिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव--

नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे राजकीय आघाड्यांमध्ये समीकरण कसे जुळणार यावरच या नगरपरिषद निवडणुकीचा खेळ आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप,शिंदेसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना, आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची युती होण्याची शक्यता आहे..

--नगरपरिषदेच्या गेल्या  निवडणुकीतील  स्थिती--

मागील निवडणुकीमध्ये भाजपाचे ९ नगरसेवक, काँग्रेसचे ६ नगरसेवक, शिवसेनेचे २ नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचा १ नगरसेवक निवडून आला होता. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून असल्याने गतवर्षी भाजपच्या सीमा डोबे ह्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. थेट जनतेतून निवडून आलेल्या भाजप नगराध्यक्ष मुळे तसेच भाजपचेच आमदार असल्यामुळे शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला.

--असे आहे जळगांव शहरातील प्रभाग निहाय मतदान--

जळगाव जामोद नगरपरिषद क्षेत्रामध्ये यावेळी एकूण २५ हजार ७११ मतदार असून यापैकी १३ हजार २८० हे पुरुष मतदार आहेत, तर १२ हजार ४३१ महिला मतदार असून पूर्वी नगर परिषदेचे ९ प्रभागात प्रत्येकी २ नगरसेवक असे एकूण १८ नगरसेवक निवडून येत असत. यावेळी १ प्रभाग वाढल्याने प्रभाग संख्या १०  झाली असून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या २१ एवढी झाली आहे.

--प्रभाग निहाय मतदार संख्या--

या निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या पुढीलप्रमाणे

प्रभाग १ मध्ये १८५६ मतदार, प्रभाग २ मध्ये २५३८ मतदार, प्रभाग ३ मध्ये २८३९ मतदार, प्रभाग ४ मध्ये २५४५ मतदार, प्रभाग ५ मध्ये २५८३ मतदार, प्रभाग ६ मध्ये २५१४ मतदार, प्रभाग ७ मध्ये २४४९ मतदार, प्रभाग ८ मध्ये २३७३ मतदार, प्रभाग ९ मध्ये २४०३ मतदार तर प्रभाग  मध्ये ३६११ मतदार आहेत.

--उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नेत्यांच्या दारी रांगा--

गेल्या चार वर्षापासून नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी नेत्यांच्या दारी रांगा लावत असल्याचे चित्र सध्या जळगाव जामोद शहरात दिसत आहे. तर काही उमेदवार सत्ताधारी व विरोधातील नेते मंडळींच्या येथे जाऊन भेटत आहेत.

Previous Post Next Post