राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक 07 डिसेंबर 2025 रोजी ग्राम दाबका, तालुका मुलताई, जिल्हा बैतूल (मध्यप्रदेश) येथून 06 वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची तक्रार मुलताई पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. या प्रकरणात कलम 137(2) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंद झाला. तक्रारदारांनी अनिल कुसराम (वय 28, रा. खडका, ता. वरुड, जि. अमरावती) याच्यावर संशय व्यक्त केला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बैतूल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बिराजदार जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार सिंह आणि पो.स्टे. मुलताईचे ठाणेदार नरेंद्र परिहार यांनी रात्रीच खडका येथे येऊन आरोपीचा शोध घेतला. बेनोडा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो.नि. विवेक देशमुख यांच्या पथकानेही शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी घरात आढळला नाही.घटनेनंतर मध्यप्रदेश पोलिसांनी अमरावती जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे व अमरावती ग्रामीणचे अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार बेनोडा व स्थानिक गुन्हे शाखेची एकूण तीन पथके अपहृत मुलगी व संशयिताचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आली. अमरावती घटकातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले.दरम्यान, दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता तिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो.नि. गोपाल उपाध्याय यांना नागरिक श्री. नंदलाल गंधे यांनी माहिती दिली की एक युवक एका लहान मुलीसह निंभोरा–देलवाडी परिसरात शेतात काम मागण्यासाठी फिरत आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता अपहृत मुलगी सुरक्षित अवस्थेत मिळून आली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अनिल कुसराम पळून गेला.यानंतर दि. 09 डिसेंबर 2025 रोजी, वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिपाई उपनिरीक्षक राजू मडावी, हेडकॉन्स्टेबल मनोज टप्पे व हेडकॉन्स्टेबल सचिन भगत यांनी संत्रा मंडी, वरुड येथे सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पथकाने शिताफीने त्याचा पाठलाग करून संत्रा मंडी ते शासकीय विश्रामगृह, वरुड येथे त्याला पकडण्यात यश मिळविले.फरार आरोपी अनिल जगलुजी कुसराम (वय 32, रा. खडका-जामगाव, ता. वरुड, जि. अमरावती) याला अटक करून पुढील कारवाईसाठी मुलताई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
