राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातृ आरोग्याच्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान सचिव वजीरे साहेब यांनी 5 डिसेंबर रोजी मेळघाट दौरा करून परिस्थितीची सखोल पाहणी केली.दिवसभर सुरू असलेल्या या दौऱ्यात त्यांनी विविध विभागांचे कामकाज प्रत्यक्ष तपासले आणि जबाबदार अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन उणिवा स्पष्टपणे मांडल्या.
'मेळघाट ऑल इज वेल' म्हणणाऱ्यांना फटकार
दौऱ्यात अनेक अधिकाऱ्यांना मैदानावरचे वास्तव माहिती नसल्याबद्दल प्रधान सचिवांनी ताशेरे ओढले. अहवालात दाखवले जाणारे आकडे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठा फरक असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक महिलांशी संवाद साधून त्यांनी कुपोषण व आरोग्य सेवांशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या.
अनेक केंद्रांची पाहणी..
या दौऱ्यात त्यांनी खालील ठिकाणांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले —प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालये,अंगणवाडी केंद्रे,आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाच्या सेवाकेंद्रातील सुविधा, पोषण आहार, रजिस्टर, आरोग्य तपासणी, औषधांची उपलब्धता याबाबत त्यांनी समाधानकारक नसलेले मुद्दे दाखवून दिले.
ग्रामस्तरावर बैठक — समस्या समोर आल्या
धरणी तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आरोग्य सेवांतील कमतरता, अॅम्ब्युलन्सची गैरसोय, पोषण आहार वितरणातील त्रुटी, मुलांच्या वजन तपासणी व गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीशी संबंधित अनेक समस्या मांडल्या.प्रधान सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले.
