सय्यद शकिल/अकोट
अकोट नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी.या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,तत्कालीन उमेदवार व नागरिकांनी १५ डिसेंबर रोजी अकोट तहसील कार्यालयावर धडक देत निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अकोट नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती.त्यामुळे २ डिसेंबर २०२५ रोजी सदर प्रभागाची निवडणूक होऊ शकली नाही.ही बाब सर्वांनाच मान्य आहे.मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकांचा दुसरा टप्पा २० डिसेंबर रोजी होत असून २१ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.अशा परिस्थितीत केवळ प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक प्रलंबित राहणे हे त्या प्रभागातील नागरिकांवर अन्याय करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी प्रभाग क्रमांक ४ मधील विविध पक्षांचे उमेदवार,राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
