रसुलपूरचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करा; ग्रामस्थांचा पंचायत समितीवर धडकून इशारा....


 रसुलपूरचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करा; ग्रामस्थांचा पंचायत समितीवर धडकून इशारा....

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

तालुक्यातील रसुलपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून नळ पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, १३ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निवेदन देण्यात आले. पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.​रसुलपूर गावात मागील काही दिवसांपासून नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. तसेच, या निवेदणाची प्रत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (MJP) उपविभागीय अधिकारी यांनाही देऊन तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देताना रसुलपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सोहेल गजानफर अली खान, अझहर पटेल, नसीम भाई, नितीन वानखेडे, आरिफ कासम तडवी, शराफत पटेल, सय्यद जावेद, मनवर तडवी, उस्मान तडवी, झाकीर भाई, वहाब भाई, हाफिज मुन्शी, जफर खान, युसुफ खान, यहिया पटेल, कलीम मिर्झा यांच्यासह इतर ग्रामस्थांचा समावेश होता.गावातील पाणीपुरवठा नेमका कशामुळे बंद आहे, याचे स्पष्टीकरण देऊन तो तात्काळ सुरू करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उपस्थित नागरिकांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post